प्रास्ताविक 2
बाह्यतः तरी सारे जग आज एका ठशाचे होत आहे. युरोप आणि अमेरिका, आफ्रिका व आशिया सारी एकाच दिशेने जात आहेत. फरक इतकाच की आशिया व आफ्रिका जरा मंद गतीने जात आहेत, तर य़ुरोप व अमेरिका घोडदौडीने जात आहेत. अर्वाचीन युगाची चिन्हे म्हणजे मोटारी, विमाने, बोलपट. ही चिन्हे अत्यंत मागासलेल्या देशातही दृष्टोत्पत्तीस पडतात. मनुष्याची प्रगती आता सारखी होत जाणार आहे ; कारण निसर्गावर त्याला सत्ता मिळत आहे, निसर्गातील साधनांचा तो स्वामी होत आहे ; आणि ही श्रद्धा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.
हिंदुस्थान नि चीनही वातचक्रात खेचली जात आहेत. आज पौर्वात्य देशांत अशांती का आहे, अस्वस्थता का आहे ? त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, जगातील इतर राष्ट्रे साहसाने, उद्योगाने, संघटनाशक्तीने सा-या पृथ्वीचा ताबा घेत आहेत, अशा वेळेस आपला विनाश व्हावयास नको असेल, ओढवणारे मरण टाळायचे असेल, तर आपणही त्यांच्या बरोबरीने उभे राहीले पाहिजे ही जाणीव आज पौर्वात्य देशांना तीव्रतेने झाली आहे. ‘पूर्व ती पूर्व व पश्चिम ती पश्चिम’ असे जे कोणी म्हणतात, त्यात फारसे तथ्य नाही. पूर्व नि पश्चिम यांच्यात तीव्र भेद आहेत असे नाही. उलट, आज ती एकत्र आणली जात आहेत. भौतिक शास्त्रे, आध्यात्मिक शास्त्रे, नवीन नवीन विचार व कल्पना, नवीन नवीन स्थापत्यतंत्रे, नाना राज्यशासनाचे प्रकार, कायद्यांची बंधने, आर्थिक संस्था, राज्यकारभारातील अनेक व्यवस्था या सर्वांमुळे नाना संस्कृतीचे लोक एकत्र जोडले जात आहेत. एकमेकांचा एकमेकांवर परिणाम होत आहे. सारे जग जणू एक विराट पुरुष बनून काम करु पाहत आहे.
जग बाह्यत: एकरंगी होत चालले असले तरी त्यामुळे आंतरिक एकता झाली आहे असे नाही. जरी आपण एकमेकांच्या जवळ ओढले गेलो तरी तेवढ्यावरुन सुखसमाधान वाढले आहे, स्पर्धा कमी झाली आहे, असे नका समजू. आपण एकमेकांना प्रेमाने भेटावे, एकमेकांनी गुण्यागोविंदाने राहावे असे आपणास अद्याप कोठे वाटू लागले आहे ? बाह्यतः जवळ आलो, परंतु मनाने दूरच आहोत. मॅक्झिम गॉर्कीने एक अनुभव नमूद करुन ठेवला आहे. एकदा शेतक-यांच्या परिषदेत तो बोलत होता. शास्त्रांचा महिमा तो सांगत होता. नवीन नवीन शोध सांगत होता. उद्योगधंद्यातील चमत्कार सांगत होता. परंतु त्याचे व्याख्यान संपल्यावर एक शेतकरी म्हणाला, “पक्ष्यांप्रमाणे आपण उडायला शिकलो. माशांप्रमाणे पाण्यात तरायला शिकलो ; परंतु पृथ्वीवर कसे नीट नांदायचे ते मात्र आपण अद्याप शिकलो नाही.”