पुनर्रचना 12
‘शूराने वस्तूचे स्वरुप नीट समजून घ्यावे; तो असे करील तर त्याला रागावण्याचे किंवा भिण्याचे कारणच उरणार नाही. त्याने मग फक्त भले करावे, आनंदात राहावे. परंतु असे जीवन जगणे कष्टाचे आहे; ती तपश्चर्या आहे; आणि म्हणूनच असे जीवन दुर्मिळ आहे.’ हे शब्द एखाद्या हिंदू संन्याशाने नाहीत लिहिलेले, युरोपातील एका थोर तत्त्वज्ञान्याचे हे शब्द आहेत. स्पिनोझा त्याचे नाव.
आणि हे पाहा, उंचातील उंच झाडालाही आकाशाला स्पर्शता येत नाही. तो एक श्लोक आहे ना?-
वाईटातही चांगले असे
चांगल्यातही दुष्टता दिसे।।
ठेवणे कुणआ नाव ना बरे
आज ना उद्या जीव हा तरे।।
अत्यंत चांगल्या माणसांतही काही दोष असतात. एखादा दुर्गुण असतो, एखादी उणीव असते, एखादी परंपरागत आलेली दुष्ट वृत्ती असते. एखादी चूक त्यांच्या हातून होते. कधी कधी स्वतःच्या गुणांचे जोरदार समर्थन हाही दोष होतो. आणि जर विश्वाच्या शक्तीची इच्छा असली तर या अशा एखाद्या चुकीचेही घोर परिणाम होतात आणि मग थोरामोठ्याचीही करुण स्थिती होते. धर्मराजाला वनवास येतो. त्याच्यावर महान प्रसंग, घोर आपत्ती ओढवतात. त्या नरविरांची ती दशा पाहून आपण द्रवतो, हळहळतो. त्या थोरांचे दोष आपणातही असतात म्हणून आपणास त्यांच्याबद्दल हळुवारपणा व आपलेपणा वाटतो असे नव्हे, तर त्या महान व्यक्तींच्या दोषांमुळे नव्हे तर केवळ दुर्दैवामुळे त्यांच्यावर दुर्दशेचा फेरा येतो, त्यामुळे अधिक वाईट वाटते. ज्यांना जगाने पापाचे पुतळे म्हणून ठरविले, ज्यांच्या उद्धाराची आशा नाही असे म्हटले, अशांनाही कधी कधी इतकी उच्च साधुता जीवनात प्रकट केली की, सा-या जगाने तोंडात बोटे घातली ! इतिहासात अशी उदाहरणे थोडीथोडकी नाहीत. मोठे लोकही पडतात व पापीही चढतात. आणि हे लक्षात ठेवून दुस-यांना शिव्याशाप देताना जरा सबुरी करावी, जरा सावधगिरी राखावी. पुष्कळ गुन्हेगारांची गुन्हेगारी अभिजात नसून सामाजिक परिस्थितीचा तो परिणाम असतो. समाजातील विषमतेला जरी वैयक्तिकरीत्या आपण प्रत्यक्ष जबाबदार नसलो, तरी आपण सारेच ती वाढवीत असतो. समाजातील गुंतागुंती, नाना परस्परविरोधी शक्ती यांमुळे पाप वाढते, गुन्हे घडतात. महान कलावान आपणास दाखवित असतात की, पतन अपरिहार्य आहे. आपण सारे ऑथेल्लोसारखे आहोत. आणि पुष्कळशा गोष्टी, ज्या हातून व्हायला नको असतात, त्या अविचाराने होतात, हृदयशून्यतेमुळे नव्हे. विचारांत चूक होते व आपण काही तरीच करतो. त्याचा अर्थ हृदयात सदभाव नव्हता असा नव्हे. एखाद्याला बहिष्कृत करणे, एखाद्याला सर्वस्वी टाकाउ समजणे हे बरे नव्हे. अशाने काही उपयोग होत नसतो. वरच्या स्वभावाखाली आपले नाना वासनाविकार खोल दडलेले असतात, आपल्या विकृती लपलेल्या असतात, आपली विचारशून्यता असते परंतु या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे शिक्षणाचा. हळुहळू आपण आपला सर्व स्वभाव ताब्यात आणू शकू. आपल्या सर्व वृत्तींना वळण लावू शकू. नविन दृष्टी येते; नवीन मूल्ये, नविन ध्येये दिसतात, नविन व्यवस्था निर्मिता येते.