सर्वत्र नकार 2
आपण भूतकाळाबद्दल अशा प्रयत्नांनी आदर व्यक्त करतो. परंतु अशा गोष्टींत बौद्धिक प्रामाणिकपणा नसतो. लहान मुलांप्रमाणे ज्यांची मते आहेत त्यांनी धर्माच्या पाठीमागे लागावे. परंतु निर्भय असे जे विचारस्रष्टे आहेत, त्यांना धर्माशी काहीएक कर्तव्य नाही. देवबीव सब झूट आहे. निर्दय, कठोर, भावनाशून्य अशा नियतीच्या हातातील आपण बाहुली आहोत. त्या नियतीला सदगुणांशी काही करावयाचे नाही, दुर्गुणांशी काही करावयाचे नाही. या नियतीच्या हातून सुटणे म्हणजे शेवटी सारे शून्य होणे.
काहींचे वर सांगितल्याप्रमाणे मत आहे, तर दुसरे काही असे म्हणतात की, देवाच्या अस्तित्वाविषयी पुरावा जरी न मिळाला तरी देव नाहीच असेही निश्चितपणे म्हणता येणार नाही. आपण कशाचाच आग्रह धरु नये. असेल असेही म्हणू नये, नसेल असेही म्हणू नये. काही होकारु नये, काही नाकारु नये. धर्माविषयी ज्यांना थोडीशी आस्था वाटते ते म्हणतात, की संशय जर आहे तर संशयाचा फायदा आरोपीला देणे रास्त आहे. हे लोक देवाला सोडू इच्छित नाहीत. देवाला आलेल्या अडचणीत साहाय्य करतात. परंतु कट्टर असा संशयात्मा जो असतो, तो म्हणतो की देव कोण व कसा आहे हे जर माहीत नाही, तर देव नाही असे क्षुद्र मर्त्य माणसाने म्हणणे म्हणजे उपमर्द आहे. नास्तिक व नियतीवादी यांच्यामध्ये हा संशयात्मा उभा राहातो. या संशयात्म्याजवळ त्या उभय वादींचा तो थोर आत्मविश्वास नसतो. हा प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचा आहे, असे त्याला वाटते.
देव आहे, असे मानल्याने काही संरक्षण आहे, असे उपयुक्ततावादी म्हणतात. धर्म म्हणजे ईश्वरावर विश्वास, त्या अमूर्ताजवळ एकरुप होणे, असे काही ते मानीत नसतात. जीवाच्या मोक्षासंबंधी आम्हाला काहीएक कर्तव्य नसून जगात सुधारणा व्हावी, असे आम्हाला वाटते. जगाच्या सुधारणेसाठी धर्माचा उपयोग करुन घेता येईल. कारण सामाजिक शांती व सामाजिक सदुन्नती यांना त्याची मदत होईल.
कोणत्याही धर्मातील बहुजनसमाज जो असतो, त्याला धर्मापासून आधार हवा असतो. ते अंधपणे श्रद्धा ठेवतात. ते जर विचार करु लागतील तर धर्मामुळे त्यांना जो ओलावा मिळतो तो नाहीसा होईल. यासाठी ते विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते नेहमी भूतकाळाकडे बघत असतात. मानवजातीला जे जे अनुभव आले व त्या अनुभवातून जे जे शहाणपण मिळाले, ते सारे भूतकाळात समाविष्ट आहे, असे त्यांना वाटते. आज जे जिवंत आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारे मृतांची खरी सत्ता आहे. ते मृतच खरोखर जिवंत आहेत. कोणी कोणी आध्यात्मिक मोक्षाची तहान असलेले केवळ व्यक्तिवादी बनतात. कोणी मुमुक्षू निसर्गवादी बनतात. कोणाला साशंकवादातच समाधान वाटते, तर कोणी काहीच नाही असे म्हणतात. असा साराच गोंधळ धर्मक्षेत्रात माजला आहे.