पुनर्रचना 23
आपण एक आहोत, मानवी हृदय व मन एक आहेत. ही भावना ज्याप्रमाणे वाढली पाहिजे, त्याचप्रमाणे युद्धासंबंधी जी एक राष्ट्रीय अशी मनोवृत्ती निर्माण करण्यात येते, तिच्यातही बदल झाला पाहिजे. हे राष्ट्रीय मानसशास्त्र फिरुन लिहिले पाहिजे. मानवजात आजपर्यंत लढत आली व पुढेही लढतच राहील, असे संशयात्म्याप्रमाणे आपण मानलेच पाहिजे असे नाही. राक्षसी वृत्तीचे पुरस्कर्ते, मनुष्यभक्षक लोकही एके काळी असेच म्हणत असत. मनुष्याने आजपर्यंत मनुष्याला खाल्ले आहे व पुढही तो खाईल. गुलामांच्या व्यापाराचे पुरस्कर्ते, द्वंद्वयुद्धाचे पुरस्कर्ते, सारे आपापली तुणतुणी अशीच वाजवीत. पूर्वी असे होते म्हणून पुढेही असेच असणार, हाच एक त्यांचा सनातन मुद्दा असे. परंतु मनुष्याचे मन हळुहळू बदलता येते. युद्धविन्मुखता, शांतीवाद, आतरराष्ट्रीय भावना या गोष्टी म्हणजे काही बिनतारी तारायंत्र नव्हे. या गोष्टी म्हणजे काही टेलिफोन नव्हे, की रेडिओ नव्हे. जगात आपले एकदम सारे गेले, असे ‘झटपट रंगा-या’चे हे काम नाही. तेथे धीर धरायला हवा. हे फार नाजूक रोपटे आहे. हे वाढायला बराच वेळ लागतो. क्षमा व सहनशीलता, परस्पर-समजुतदारपणा, परस्परांबद्दल आदराची भावना, यांचे खत घालू तर हे रोपटे झपाट्याने वाढेल. ‘मानव जात सारी एक’ हा मंत्र बालपणापासून कानांवर जायला हवा. शांतता स्थापण्याची वृत्ती त्यांच्यात रोविली पाहिजे. आम्ही जगात खरी शांती आणू असा संकल्प त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. युद्धाने मानवजातीचे तुकडे तुकडे केले आहेत, युद्ध हे स्वतःच स्वतःशी भांडण्याप्रमाणे आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबविली पाहिजे. निसर्गाने तुम्हास एक होण्यासाठी निर्मिले. परंतु ही युद्धे खोटे भेद निर्माण करुन माणसामाणसास अलग करतात. तुम्ही जर भाऊभाऊ आहात तर एकमेकांचा का नाश करता? युद्धाची ही वृत्ती मानवजातीच्या बाल्यावस्थेत शोभली. आज ती शोभत नाही. परंतु काही या युद्धवृत्तीभोवती भ्रामक भव्यता निर्माण करतात, तिच्या भोवती भावनांचे तेजोवलय निर्मितात. परंतु या युद्धाने काय साधते? थोड्यांची चंगळ होते. परंतु लक्षावधींना हायहाय करीत बसावे लागते. प्राण ही पवित्र वस्तू आहे. कोणाचीही हत्या होणे म्हणजे देवाचा अपराध आहे. जीवनाची पवित्रता सर्वांच्या मनावर सारखी बिंबविली पाहिजे. युद्धामुळे आपणास हिंसेची सवय होते. ज्या द्वेषमत्सरांना संस्कृती गाडू पाहते, तेच युद्धे पसरवितात. मनुष्यांच्या हृदयांत त्यांच्याकडून द्वेषाची बीजे पेरली जातात, कोट्यवधी लोकांच्या मनात परस्परद्वेषाचे गराळे पुन्हा निर्मिले जातात. अत्याचारत, मग तो शारीरिक असो किंवा अन्य प्रकारचा असो, क्षुद्र वृत्तीतूनच जन्मत असतो. आपला स्वार्थमूलक स्वभाव आहे त्यातून हिंसा जन्मते. कामातून क्रोधाचा संभव, स्वार्थातून संहार. अशा या हिंसेत ना तथ्य, ना महत्त्व! सर्व सामाजिक मूल्यांचा विनाश अशा स्वार्थमुलक हिंसेने होत असतो.