पुनर्रचना 4
आध्यात्मिक क्षेत्रात, ज्याने त्याने स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने असे स्वातंत्र्य घेणे म्हणजे चुकाही होणारच. परंतु या चुका मुद्दाम केलेल्या नव्हत्या. या चुका दुःखकारक असल्या तरी सत्यशोधनाचेच ते प्रामाणिक प्रयत्न होते. अधिक खोल असलेल्या गहन-गंभीर प्रश्नांचा सतत अभ्यास करीत राहिल्याने या चुका कमी होत जातील, दुरुस्त करता येतील.
भविष्यकाळातील धर्म अत्यंत उदार व व्यापक हवा. जे जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत त्या सर्वांचा उद्याच्या धर्मात समावेश झाला पाहिजे. पंथस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य सर्वास दिले गेले पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या मनात काढू दे विचार-चित्रे, खेळवू दे स्वप्न. धर्म म्हणजे अतिन्द्रिय वस्तुविषयाची एखादी सांगोपांग मांडलेली विचारप्रणाली नव्हे. व्यापक अर्थाने पाहिले तर धर्म म्हणजे मनाची विशिष्ट वृत्ती, प्रत्येकाच्या आत्माचा कल.
तुमची मते काय, तुमचे मंत्र कोणते, तुमचे तंत्र कोणते यावरुन तुमची परीक्षा नाही करावयाची. तुमची परिक्षा शेवटी तुमच्या जीवनावरुन केली जाईल. तुम्ही कसे वागता, तुमचे चारित्र्य काय, याला महत्त्व आहे. कोणत्याही धर्माचे लोक असोत, जे खरे धर्मिक असतात त्यांची दृष्टी वा वृत्ती सर्वत्र तीच दिसून येते. संत कोणत्याही धर्माचा असो. सा-या संतांचे जीवन एकरुपच आढळेल. अशा धर्मात्म्यांची मनःशांती कालत्रयीही भंगत नाही. आपत्तीचे डोंगर कोसळोत, दुर्दैव पाठीस लागो, ते स्थितप्रंज्ञच असतात. आणीबाणीच्या वेळीही जे शांत राहतात, कितीही संकटे आली तरी ज्यांचा आत्मा अजिंक्य राहतो, त्याच्याजवळच स्वतः मोठेपणा आहे. सर्व आध्यात्मिकांचे सार ते हेच. अविचल श्रद्धेचे लोक ज्या जगाला जिंकून घेतात, त्या जगाहून ते मोठे असतात, श्रेष्ठ असतात. गोळ्यांचा वर्षाव होत असला तरी ते सत्यच सांगतील. त्यांना क्रॉसवर चढवा, जाळा, फाशी द्या, ते सत्यापासून परावृत्त होणार नाहीत. व्यापक अशी त्यांची दृष्टी असते. त्यांच्या दृष्टीला स्वार्थ ओंगळ दिसतो, आसक्ती त्यांना शिवत नाही. सर्वांच्या हितात स्वतःचे हित आलेच, निराळे स्वतःचे हित ते काय पाहायचे, असे ते म्हणतात. त्यांच्या त्यागाला मोजमाप नसते, तेथे हिशेबीपणा नसतो. त्यांचा त्याग निरपेक्ष असतो. मोबदला मिळावा अशी इच्छा चुकूनही त्यांच्या मनात नसते. त्यांचे जीवन असे यज्ञमय झालेले असते. तो त्यांचा स्वभावच बनतो. स्वतःला शून्य करणारा हा त्याग, ही धीरवीरता, ही शांती, सर्वसाधारण मनुष्यास शक्य नाही, असे म्हणून आपण मोकळे होत असतो. पराभूत झालेल्या गॅलिलिच्या कोळ्यांना अशा त्यागाने समाधान लाभत असेल, दुबळ्या हिंदी मनाला अशा आत्मसमर्पणाचे कौतुक वाटत असेल, परंतु आम्हाला नको हे निर्वाण, असे कोणी कोणी म्हणतात. संयमी जीवनावर धर्माने भर दिला आहे. प्रत्येक धर्माने त्यागाची शिकवण दिली आहे, स्वतःला विसरायला सांगितले आहे. धर्म म्हणजे काही एखादी गोरीगोमटी वस्तू नव्हे, फुकाफुकी लाभणारी समाधाने धर्मिक नव्हेत.