Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 9

स्वतःच्या जीवनाची पूर्णता हे जे परंपरागत ध्य़ेये, त्याच्याशी वरील विचारसरणीचा उघड विरोध दिसतो. पूर्वी व्यक्ती आपल्या स्वतःच्या मोक्षाचा विचार करी. सामुदायिक मोक्षाचा विचार समोर नसे. व्यक्तीने स्वतःच्या उद्धार करावा. स्वतः मुक्त व्हावे, यावर भर दिला जात असे. धर्मामध्ये जी अधिकारवृत्ती शिरली, तिचा हा परिणाम असावा. चालीरीतींना, नाना पद्धतींना व प्रकारांना, नाना संस्थांना पाठिंबा देणारे एक साधन म्हणून, धर्म उपयोगिला जाऊ लागला. आणि ज्यांना अशा परिस्थितीत आत्मविकासास अवसर मिळेना ते रानावनात गेले, गुहांतून वा गिरीशिखरांवर राहू लागले. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली. ‘अस्ति तत् समर्थयितव्यम्’ हा न्याय रुढ झाला. अमुक धर्माच्या विरुद्ध आहे, तमुक धर्माच्या विरुद्ध आहे, असे सदैव सांगण्यात येऊ लागले. परंपरेला सांभाळणे म्हणजेच धर्म असे झाले. मग प्रगती कोठून होणार ? काही व्यक्ती मधूनमधून आपणास दिसतात की, ज्यांनी पूर्णतेचे शिखर गाठले. परंतु ह्या सर्वांना खरोखरची मुक्ती मिळाली असे म्हणता येणार नाही. क्रोध व भय, दुःख व संकट यांच्यापासूनच मुक्त व्हायचे आहे असे नाही, तर अलग राहणे, एकांतवासात राहणे, या वृत्तीपासूनही मुक्त झाले पाहिजे. सर्व मानवांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांमध्ये ती शक्यता आहे, दिव्यता सर्वांच्या ठायी आहे, असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल, ते सर्व जगाचा उद्धार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. सर्व ख-या धर्माचा आत्मा एकच आहे. तो हा की, मनुष्य पूर्ण होणे शक्य आहे, मनुष्यामध्ये ईश्वरी अंश आहे व त्या दिव्य आध्यात्मिक जीवनात सारी मानवजात सारखी एकत्र उभी आहे. सारे मानवप्राणी दिव्य आध्यात्मिकतेने रंगलेले प्रत्यक्ष येथे दिसत नसले, तरी त्या ध्येयभूत जीवनात तसे दिसतात. जो जीव मुक्त झाला, ज्याने देवाशी सख्य जोडले व म्हणूनच जो शक्तीमान झाला, त्याने स्वतःच्या समाधीतच डोलत राहू नये; कर्महीन दयेत कृतार्थता व समाधान मानू नये. त्याने प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. जोपर्यंत जग दुःखीकष्टी आहे, जोपर्यंत जग चिखलात रुतले आहे, तोपर्यंत त्या मुक्त पुरुषाला तरी खरी शांती कशी लाभणार ? तो का जगातील ही आग व ही हायहाय स्मितमुखाने स्वस्थपणे पाहत बसेल ? बाह्य जगाशी नीट मेळ घातल्याशिवाय स्वतःच्या जीवनातही कोणाला मेळ घालता येणार नाही. जोपर्यंत पृथ्वीवर देवांच राज्य आले नाही, तोपर्यंत संतांनी आपले सारे जीवन या बाह्य जगासाठी सेवेत ओतले पाहिजे;  ते देवाचे राज्य पृथ्वीवर यावे म्हणून हळूहळू झेंडा फडकवीत त्यांनी पुढे जात राहिले पाहिजे, जगाला पुढे नेत राहिले पाहिजे. जगाचा जोपर्यंत बचाव नाही, तोपर्यंत कोणाचाही बचाव नाही. जग मुक्त नाही तोवर कोणीही मुक्त नाही.

सदगुण म्हणजे उत्तरोत्तर अधिकाधिक उच्चत्वाकडे जाण्याचा अव्याहत प्रयत्न. दुर्गुण म्हणजे अहंतृप्ततेची वृत्ती क्षुद्र मनाचे चिन्ह आहे. उदात्त ध्येयाची जाणीवही नसणे याहून अधिक आपत्ती ती कोणती ? जोपर्यंत वर जावेसे वाटत आहे, तोपर्यंत सुधारणेस वाव आहे- मग ती किती का पापी असेना. सद्सदविवेकबुद्धीची जोपर्यंत टोचणी थांबली म्हणजे सारे संपले. मग जगत असलो तरी ते मरणच समजावे. ते मेल्यप्रमाणे जगणे जितका अधिक विकास, तितके अधिक असमाधान. ध्येयाची गाठ पडेपर्यंत कोठली शांती ?

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26