सर्वत्र नकार 13
कत्तली करणारे सैनिक एके काळी माणसे होती. परंतु एकदा लष्करात भरती झाली की त्यांना स्वतंत्र इच्छा नाही, त्यांना मन नाही, आत्मा नाही, आशा नाही, काही नाही ! एका मोठ्या यंत्रातील ते छोटे भाग बनतात व यंत्र फिरवील तसे त्यांना फिरावे लागते. त्या यंत्रासमोर नमावयास त्यांना शिकविलेले असते व इच्छेने वा अनिच्छेने त्या यंत्राला ते प्रमाण करतात. बुद्धिप्रधान माणसास अशा रीतीने स्वेच्छाहीन गुलाम बनविण्यात येते. युद्धाचे एकदा रणशिंग वाजले की संस्कृतीच्या गप्पा दूर राहतात आणि मनुष्य जणू अगतिक होऊन पशू होतो. युद्ध म्हणजे मानवजातीवरचा अत्यंत क्रुर असा अत्याचार ! शेतेभाते उद्ध्वस्त होतात. शहरे बेचिराख होतात. लाखो लोक ठार होतात. लाखो अपंग होतात. कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय. लाखो स्त्रिया निराधार होतात. त्यांची विटंबनाही होते.मुलांना कोण सांभाळणार, कोण खायला देणार ? सर्वत्र दुष्काळ व मरण. जिकडे तिकडे द्वेषाचे मारक वातावरण. कारस्थाने सदैव चाललेली. कुटिल डावपेच चाललेले असे हे युद्ध असते. जोपर्यंत अशा या सैतानी नाचाचा, या भीषण भुतेरी नृत्याचा आपणास वीट येत नाही, तोपर्यंत आपण सुधारलेले आहोत व सुसंस्कृत आहोत, असे कोणत्या तोंडाने म्हणायचे ? हा दंभ किती वेळ आपण दाखविणार ? जोपर्यंत तोफा डागून लक्षावधी माणसांची कत्तल आपण करीत आहोत, विषारी धूर सोडून हालचाल करुन लोकांना, नागरिकांना मारीत आहोत, म्हातारे असोत की मुले असोत, स्त्रिया असोत की आजारी असोत, सरसकट आगीचा वर्षाव वरुन करीत आहोत, तोपर्यंत प्राण्यांना क्रूरता दाखवू नये म्हणून कायदे केलेत किंवा प्रचार केलेले, आजा-यांसाठी दवाखाने घातलेत, किंवा निराश्रितांसाठी अनाथालये उघडलीत तरी काय उपयोग ? तेवढ्याने तुम्ही खऱोखर सुधारलेले असे सिद्ध होणार नाही. आणि ही युद्धे, या कत्तली कशासाठी ? देवाच्या वैभवासाठी? राष्ट्राच्या गौरवासाठी!
युद्धे अजिबात बंद करता येत नाहीत म्हणून निदान त्यांना नियमित तरी करु या, तशी खटपट करु या, असे काही म्हणतात. काहींचे तसे प्रयत्न चाललेले असतात ही गोष्ट खरी आहे. परंतु तो प्रयत्न यशस्वी होणे शक्य नाही. दोन परस्परविरुद्ध अशा राष्ट्रांतील स्पर्धेचे व संघर्षाचे मूर्त रुप म्हणजे युद्ध. युद्ध म्हणजे मनातील वैराचे बाह्य प्रतीक. या स्पर्धेचा शेवट, वैराचा निकाल शक्तीने लावायचा असतो. एकदा बळाला कवटाळले, प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी शक्ती हाच उपाय असे एकदा ठरवले, म्हणजे मग त्यात वाईट-चांगले काय ठरवणार ? दोन्ही पाशवी शक्तीच. ही पाशवी शक्ती अधिक सुसंस्कृत, ती कमी सुसंस्कृत अशी निवडानिवडी कशी करता येईल? एकदा शक्तीच्या जोरावर सारे करायचे ठरले, म्हणजे असेल नसेल ती सारी शक्ती आपण संघटित करतो व प्रतिपक्ष्याला धुळीस मिळवू बघतो. दंडा व खड्ग यांत तसे फारसे अंतर नाही. तोफा-बंदुकांची दारु व विषारी धूर यांत काही विशेष फरक नाही. जोपर्यंत शस्त्र हे प्रतिस्पर्ध्याला दडपून टाकण्याचे साधन म्हणून मानले जात आहे, तोपर्यंत प्रत्येक राष्ट्र आपापली हिंसामय शस्त्रास्त्रे अधिकाधिक वाढविणार, ती शस्त्रे अधिक प्रभावी करण्याची खटपट करणार. युद्ध दुसरा कायदा ओळखीत नाही. युद्धात विजयी होणे म्हणजेच परमोच्च सदगुण मानतात. प्रत्येक राष्ट्राला अशा प्रकारे या भीषण व मरणाच्या रस्त्यावरुन जाणे भाग पडते. युद्ध ही वस्तु ग्राह्य नाही, फक्त तिची पद्धत सुधारली पाहिजे, असे म्हणणे म्हणजे लांडगा कोकराला खातो हे वाईट नाही, फक्त त्याने नीट, पद्धतशीर रीतीने खावे, असे म्हणण्याप्रमाणेच आहे. युद्ध म्हणजे युद्ध; तो काही खेळ नाही. खेळात आपण नियमाप्रमाणे खेळतो. परंतु युद्धात सारेच क्षम्य ठरते!