पुनर्रचना 8
एखादा नीतिशास्त्रज्ञ जर ही मिळालेली पुंजी भिरकावून देईल किंवा तिचा नाश करील तर ते योग्य नाही होणार. जे मिळालेले आहे ते स्वीकारले पाहिजे. जे आहे त्याचा आधारावर उच्च इमारत बांधावयास हिंमतीने उभे राहिले पाहिजे. जे आहे त्याचा स्वीकार करणे व त्याचीच नीट व्यवस्था लावणे एवढ्याने मनुष्याला कधीही समाधान नसेत. त्याला पुढे नेऊ पाहणारी, उच्चतर जीवनाकडे नेणारी एक अमर, प्रबळ प्रेरणा त्याच्या अंतरंगात असते. ही प्रेरणा, ही आतील ऊर्मी मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. जे आहे ते सांभाळणे एवढेच जीवनाचे साध्य नाही. जे आहे ते उदात्त करणे हा जीवनाचा अंतिम हेतू आहे. ही जीवनाची उदात्तता आहे. प्रत्येकाला अधिकाधिक अर्थ समजून घ्यावयाचा असतो. अधिकाधिक पूर्णपणे जगावे असे त्याला वाटत असते. तो वाढत असतो. स्वतःच्या पलीकडे जातो. बीजाचा विशाल वृक्ष होतो. तो काही तरी होत जातो, बनत जातो, हेच त्याचे व्यक्तीत्व; हेच त्याचे विशेष अस्तित्व; हेच विकसन. परिस्थितीशी जमवून घेणे म्हणजे नैतिक जीवन असा जर आपण अर्थ केला, तर जोपर्यंत परिस्थिती बदलत आहे, तोपर्यंत हे नैतिक जीवनही थांबणार नाही. तेही बदलत राहील आणि म्हणूनच जीवनाची जी बाह्य रुपे प्राचीन काळात दिसत ती आज नाही दिसणार. जीवनाच्या त्या स्वरुपाची पुनरावृत्ती नाही होणार. तसेच्या तसे भूतकालीन जीवन आजही आम्ही जगू असे म्हटले, व समजू या की ते शक्य झाले, तरी ते इष्ट होणार नाही. आजच्या काळी पूर्वीचे रजपूत योद्धे किंवा मध्ययुगातील वीर पुरुष शक्य नाहीत. ते नमुने आजच्या परिस्थितीत असंभाव्य आहेत आणि परिस्थिती बदलतच नसेल तर ? सदा सर्वदा तीच परिस्थिती सभोवती सर्वत्र असेल तर ? तरीही प्रश्न सुटत नाही. कारण आपली ध्येये नेहमी बदलत असतात. केवळ परिस्थितीशी जुळवून घेण्यात खरे नैतिक जीवन नाही. आपल्या ध्येयांना परिस्थिती अधिकाधिक अनुकूल करणे यातच खरोखर नैतिक जीवनाचा आत्मा आहे. परिस्थितीला असा आकार द्यायचा, की तिच्यातून आपली ध्येये उत्तरोत्तर अधिक प्रकट व्हावी. जे आहे त्याचा नम्रपणे स्वीकार करणे, जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेणे यातही एक प्रकारची शांती आहे, हीही एक प्रकारची पूर्णता आहे; परंतु ही मानवी जीवनाची परिपूर्णता नव्हे, हा मनुष्यत्वाचा विकास नव्हे. ही शांती खरी आध्यात्मिक नव्हे. जे आहे ते घेऊन त्यातून हिंमतीने नवीन निर्मिले पाहिजे. जी परिस्थिती आहे, तिला आपल्या हेतूच्या पूर्ततेसाठी अनुकूल करुन घेतले पाहिजे. हा पुरुषार्थ आहे. एखाद्या गोगलगाईप्रमाणे कठीण कवच अंगावर घेत परिस्थितीशरण असे राहणे हे वीराचे काम नाही. जो जगाला वर उचलतो तो खरा वीर. जग ज्या त-हेचे असावे असे आपणास वाटते, त्या त-हेचे ते थोडेफार करण्यासाठी खटपट करणे. हे मनुष्याचे खरे काम. जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे, अधिक उच्च पातळीकडे ते नेणे यात खरे भूषण. परिस्थितीशी सम्यक मेळ घालणे यात सौंदर्य नाही असे नाही. परंतु बदलत्या व विविधतेने नटलेल्या बहुरुपी जगात अशी सुंदरता फार वेळ टिकू शकणार नाही. ती तडजोडही टिकणार नाही. बालकाचे निष्पाप सौंदर्य तडफदार तारुण्याला जागा देते. हे कर्मोत्सुक उत्साही तारुण्य पोक्त पावन वृद्धत्वाला वाव देते. आणि असे हे सर्वत्र चालले आहे. जीवनाच्या मार्गावर मुक्काम नाही. येथे विश्रांती नाही. एक संपले की त्यातूनच नविनाचा आरंभ होतो. मरणातून जीवनाची कळी वर येते.