Get it on Google Play
Download on the App Store

प्रश्न 10

ज्या संस्कृतीचा स्पर्धा हा पाया आहे, जी संस्कृती काही विरोध उत्पन्न झाला असता शक्तीनेच त्या प्रश्चाचा सोक्षमोक्ष लावू पाहते, शक्तीलाच जी न्यायाधीश करते, शक्ती हेच जिंच उपास्य दैवत असते, ज्या संस्कृतीचा अभिमानी समाज फक्त एक अर्थशास्त्र जाणतो, ज्या संस्कृतीत उथळ विचारालाच महत्त्व मिळते, कला केवळ वासना-विकारात्मक असते, ज्या संस्कृतीत नीती शिथिल होते, संयमाला स्थान नसते, ती संस्कृती रजोगुणात्मक होय. ती सत्वगुणात्मक नव्हे. आणि म्हणून ती टिकू शकणार नाही. विनाशाच्या दरीकडे दुनिया झपाट्याने जात आहे. अशा वेळेस आपण आध्यात्मिक पायावर पुनर्रचना, पुनर्घटना करु तरच तरणोपाय आहे. पैगंबराचे शब्द अशा वेळेस आठवतातः

‘अरे, नका रे मरु. मागे वळा, मागे वळा. का उगीच मरता?’

हेगेल या थोर तत्त्वज्ञान्याने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘मानवजात इतिहासापासून काहीएक शिकत नाही, ही एक गोष्ट मात्र आपण इतिहासापासून शिकतो.’ हेगेलचे हे म्हणणे आपण खोटे पाडणार का त्याच्या म्हणण्याला आपण आपल्या कृतीने आणखी पुरावा पुरविणार ? संस्कृतीचे भवितव्य-अखिल मानवजातीचेच भवितव्य संकटात आहे. ह्या भवितव्याला अजूनही आपण मनात आणू, तर वाचवू.

{* अर्थ एव अभिजनहेतुः, धनमेवाशेषधर्महेतुः, अभिरुचिरेव दांपत्यसंबंधहेतुः, अनृतमेव व्यवहारहेतुः, स्त्रीत्वमेवोपभोगहेतुः, ब्रह्यसूत्रमेव विप्रंत्वम्, लिंगधरणमेव आश्रमहेतुः।     (विष्णुपुराण, ४-२४-२१)}

अजून तुकडे पडण्याइतके कठीण ते नाही झाले. अजून ते आकार देता येईल असे आहे. अजून ओले आहे, जरा मऊ आहे. मानवजात वाचेल अशा प्रकारचे जग करणे आपल्या हातात आहे.

निराश होण्याची जरुरी नाही. पृथ्वीवर आपण जन्मून काही फार काळ झाला नाही. आपण अर्धवट सुधारलेले आहोत यात आश्चर्य नाही. अनंत भविष्यकाळ समोर उभा आहे. सूर्य अजून एक कोट वर्षे तरी थंड होणार नाही. या पृथ्वीवर तोपर्यंत आपण राहू शकू अशी ग्वाही शास्त्रज्ञ देत आहेत. आपण जर प्रगती करीत जाऊ, केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे. केवळ यांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्याही जर प्रगत होत जाऊ, तर मानवजातीला उज्ज्वल भविष्य आहे. आजच्या वेदनांतून व उलथापालथीतून काही तरी मंगलच निर्माण होईल, असे मानण्याइतका आशावादी मी आहे. परंतु कोणतीही सुधारणा करण्यापूर्वी निःपक्षपातीपणे निरीक्षण-परिक्षण करणे अगत्याचे असते. पृथक्करणाची जरुरी असते. मोकळेपणाची रास्त टीका होणे हिताचे असते. जे न हलणारे असे आळशी गोटे असतात, अहंप्रज्ञ व अहंपूर्ण असे जड-जरठ वृत्तीचे हटवादी असतात, अशांना जर कोणी जोराजोराने धक्केचपेटे दिले, तर त्या गोष्टीचे अभिनंदनच केले पाहीजे. रुढींना जे आव्हान देतात, वाढत्या मताच्या मानगुटीस भूतकाळचे भूत बसविणा-यांवर जे जोरदार हल्ला चढवितात, त्यांचे कौतुक कसे पाहिजे. प्रामाणिकपणे चूक कबूल करणे म्हणजेच सुधारणेचा आरंभ. जरी भविष्यकाळाच्या पोटात काय आहे हे आपण फारसे पाहू शकणार नाही, तरी जेथपर्यंत विचाराची दृष्टी जाऊ शकते, तेथपर्यंतचा तरी मार्ग आखता येणे शक्य आहे.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26