Get it on Google Play
Download on the App Store

सर्वत्र नकार 11

या लोकसत्तात्मक म्हणून मिरवणा-या देशांत अज्ञान बोकाळले आहे. शिथिलता शिरजोर झाली आहे. सदभिरुचीला स्थान नाही, संयम व शिस्त नष्ट झाली. तेथील वृत्तपत्रे पाहा म्हणजे वरील गोष्टींचा पुरावा मिळेल. लोकसत्तात्मक राष्ट्रांतील बहुजनसमाज मुख्यत्वेकरुन काय वाचतो ? वर्तमानपत्रांत कोणता मजकूर असतो? कोणत्या गोष्टींना स्थान असते? घटस्फोटांच्या हकीकती, खून, नाचरंग, गुप्त पोलिसांच्या गोष्टी, कोर्टाच्या आवारातील हकिकती, हे सारे तेथे आढळते. या खांद्यांवर पुष्टी होणारी लोकशाही कशी असेल बरे? कितीशी सुसंस्कृत ती असेल बरे ? कसे असेल तिचे अंतरंग ? शिक्षणाच्या सोयी जरी पुष्कळांना अनुकूल असल्या, तरी संस्कृतीचा दर्जा वाढला, असे झाले नाही. कॉलेजात जाने सोपे झाले आहे, परंतु सुसंस्कृत होऊन, ख-या अर्थाने सुशिक्षित होऊन बाहेर पडणे दुष्कर झाले आहे. वाचायला आपण शिकतो, परंतु विचार करायला शिकत नाही. आणि वृत्तपत्रे, नियतकालिके, बोलपट, नभोवाणी ही जी लोकशिक्षाणाची साधने, त्यांनी कोणते शिक्षण देण्याचे ठरविले आहे ? अर्धवट लैंगिक ज्ञान, संततिनियमनाची माहिती, फ्रोंइड व जंग यांच्या मानवशास्त्रांची मोडकीतोडकी हकिकत, मनोविश्लेषणाच्या नावाने पाणचट व चटोर गोष्टी हे सारे पुरवले जात आहे. जे समंजस आहेत, शिकवण्याची ज्यांना पात्रता आहे, ज्यांना अधिकार आहे ते भीतीने बाजूला उभे राहतात आणि बहुजनसमाजाच्या विचाराशी व मनाशीच एकरुप होतात. आज साराच गोंधळ माजला आहे. अधिकारवाणीने कोण सांगणार ? पवित्र परंपरा तीही मेली. बहुजनसमाजाच्या वृत्तींना वळण कोण देणार, त्यांच्या शक्तीला व उत्साहाला मार्ग संस्कृती कोण दाखवणार? त्यांच्या भावनांना विचारांची वेसण कोण घालणार ? आज वृत्ती स्वैर झाल्या आहेत. भावना उच्छृंखल होत आहेत. वर्गद्वेष पसरत आहे. प्रक्षोभ वाढत आहे. आपणासमोर जे महान प्रश्न आहेत त्यांना तोंड देण्याची कोणातही हिंमत नाही; त्या प्रश्नांचे स्वरुप समजावून घेण्याची पात्रता नाही; आणि वेळही नाही. किंवा समतोल विचार करणारे असे जे द्रष्टे आपणांत काही आहेत, त्यांच्यावर श्रद्धा व विश्वास ठेवण्यास आपण तयार नाही. बहुजनसमाजाचे मत तेच प्रमाण. संख्येला महत्त्व. आरडाओरडीली मान. विचारवंतांच्या मताला किंमत नाही. विचाराच्या पेढीवर आज प्रमाणबद्ध, मनःपूर्वक बनवलेल्या मताला किंमत नाही; तर घाईघाईने बनवलेली मते, ना ज्यांना ताळ ना तंत्र, तीच आज तेथे स्वीकारली जात आहेत.

कारखान्यातील जसा एका साच्याचा माल बाहेर पडतो, त्याप्रमाणे सर्वांच्या मनातून ठराविक विचार व ठरीविक कल्पनाच बाहेर पडाव्यात, अशी वृत्ती लोकशाही देशांतून दिसून येते. आपली मने स्वतंत्र विचार करीत नाहीत, यांत्रिक रीतीने विचार करतात. मनाचे यंत्र झाले की सारी सृजनशक्ती नष्ट झाली असे समजावे. स्वतंत्र निर्माणशक्तीला वावच नाही. परमोच्च अशी जी निर्मिती होत असते ती ठराविक साच्याप्रमाणे विचार करणा-या मनातून कधीही होत नाही. ज्याच्याजवळ वस्तूंच्या अंतरंगात शिरणारी प्रज्ञा असते, जो कठोरपणे व अनासक्तपणे विचार करु शकतो, जो आजूबाजूच्या लोकांपेक्षा जरा उंच जाऊन बघतो व शांतपणे मनन व चिंतन करतो, तोच जगाला नवीन असे काही देऊ शकतो. तोच जगाला नविन सृष्टी दाखवील, नविन दृष्टी देईल. आणि खरोखर खोल जर आपण पाहू, तर नाव लोकशाहीचे जरी असले तरी तिच्या प्रत्यक्ष व्यवहारात एकशाहीच दिसून येईल. हे म्हणणे विरोधात्मक भासले खरे आहे. लोकशाहीचा आत्मा कशात आहे ? व्यक्तीला स्वातंत्र्य असणे, व्यक्तीला मान असणे, हाच तो आत्मा. इब्सेन म्हणतो, ‘मनुष्या, तू तू अस.’ परंतु आजच्या लोकशाहीत व्यक्तीत्वाला वाव कोठे आहे ? एका ठराविक नमुन्याचे आपण सारे बनत आहोत. आपले आंतरिक स्वतत्र जीवन आज मेले आहे. आपले आपले सर्वांचे विचार जर एकरुप झाले, एका ठशाचे झाले तर प्रगती खुंटलीच म्हणायची.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26