Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 24

ज्या देशभक्तीला प्रथम, शेवटी, नेहमी, स्वतःच्या देशाशिवाय दुसरे काही दिसतच नाही, ती देशभक्ती मानवजातीच्या उच्च ध्येयाची दृष्टी आपणास देऊच शकत नाही. देशभक्तीने आपण एक प्रकारे आंधळे होतो. जणू डोळ्यांवर एक प्रकारची झापड येते, नशा चढते. ‘शिकागो ट्रिब्यून’ या नावाचे एक अमेरिकन पत्र आहे. त्याच्यावर कोणते ब्रीदवाक्य आहे, माहीत आहे ?
‘माझा देश! दुस-या राष्ट्रांशी व्यवहार करताना माझा देश नेहमी बरोबर असू दे, त्याच्या होतून चूक न होवो! परंतु शेवटी चूक होवो की न होवो, माझा देश तो माझा देश!’

स्वतःच्या राष्ट्राबद्दल योग्य तो अभिमान नसावा, असे नव्हे. परंतु दुस-याबद्दल तुच्छता दाखविणे यात मात्र धोका असतो. अभिमान असू दे, घमेंड नको, स्वतःची प्रतिष्ठा ठेवा; परंतु दुस-याची अप्रतिष्ठा करु नका. आपले ते सारेच चांगले, आपले सारे बरोबर, आपल्या कृत्याचे नेहमी समर्थन करणे, ही भ्रामक देशभक्ती होय. नैतिक कायद्याचे डोक्यावर राष्ट्राला बसवू नये. राष्ट्रीय सरकार हे सर्वतंत्र-स्वतंत्र असते, अशी एक विचारसरणी निघाली आहे. राष्ट्रीय सरकार कधी चूक करु शकतच नाही, त्यांच्यावर टीका करता येत नाही, त्याने केलेली युद्धे ही नेहमी न्याय्यच असतात, अशी ही विचारसरणी म्हणजे शुद्ध अधर्म आहे. परंतु हा अधर्मच अर्वाचीन जगाचा धर्म झाला आहे आणि हा धर्म आपल्या अनुयायांपासून काय काय तरी अपेक्षितो! कोणत्याही धर्माने मानवजातीचा असा एकजात अकारण संहार करायला लावले नाही; परंतु हा आजचा राष्ट्रधर्म मात्र अशा निष्कारण कत्तली आपल्या अनुयायांपासून अपेक्षितो. बोल्शेव्हिक लोक सर्व मानवजातीचा उद्धार करु बघत आहेत. ते वंश किंवा राष्ट्र बघत नाहीत. रशियाकडेही राष्ट्र या दृष्टीने ते बघत नाहीत. ऱशिया म्हणजे नव श्रद्धेच्या प्रसाराचे एक साधन. अंध देशभक्तीला बोल्शेव्हिक चाट देतात हे ठीक आहे. त्या बाबतीपुरते त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. लेसिंग हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणाला होता, ‘देशभक्ती म्हणजे दुबळेपणा होय. या दुबळेपणात दिव्यता असली तरी शेवटी तो दुबळेपणाच. हा दुबलेपणा दूर केला तरच बरे.’ दंडुक्यापेक्षा श्रेष्ठतर असा दुसरा कायदा आहे; देशभक्तीच्या अहंकाराहून श्रेष्ठ असे दुसरे प्रेम आहे. देशप्रीती सर्व मानवजातीच्या प्रीतीशी अविरोधाने राहू शकेल. दोघीत विऱोध येण्याची जरुरी नाही. मानवजातीवर प्रेम करुनही देशावर प्रेम करता येईल. देशावर प्रेम करुनही मानवजातीवर प्रेम करता येईल. राष्ट्रे म्हणजे तरी मानवजातीचेच घटक ना ? प्रत्येक राष्ट्राला त्याच्या त्याच्या विशिष्ट ऐतिहासिक परंपरेतून एक प्रकारची प्रेरणा मिळत असते. प्रत्येकाचा विकास त्या त्या परीने होईल. परंतु म्हणून प्रत्येकाने इतरांपासून अहंकाराने अलग राहण्याची जरुरी नाही. माझीच प्रेरणा काय ती खरी, माझीच दिशा बरोबर, असे म्हणण्यानेच सारे बिघडते. आत्मश्लाघा ज्याप्रमाणे आपण गर्ह्य मानतो, त्याप्रमाणे स्वतःच्या राष्ट्राची स्तुती करीत बसणेही गर्ह्यच मानले पाहिजे. फिरस्ते आपल्या मालाची स्तुती करीत हिंडतात, त्याप्रमाणे आपल्या संस्था, आपली मते यांची स्तुती करीत बसणे बरे नव्हे. ते हीनतेचे, दुरभिरुचीचे लक्षण समजावे. वृथा गौरव, आत्मश्लाघा, दुस-यास तुच्छ लेखणे म्हणजे राष्ट्रधर्म नव्हे.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26