प्रश्न 8
यंत्राचे गुणधर्मच आजच्या संस्कृतीचेही झाले आहेत. आपले सदगुणही यांत्रिक झाले आहेत. वेग, संख्या, सारखेपणा, बाह्य वस्तुंत रंगणे हेच आजचे गुण. याचा परिणाम असा झाला की, आंतरिक जिव्हाळा नाहीसा झाला. आध्यात्मिक ओलावा सुकून गेला. ती जी आंतरिक एकता व एकसूत्रता ती आज नष्ट झाली आहे. एक प्रकारचे मानसिक अराजक निर्माण झाले आहे. मनोराज्यांत कोणी स्वामीच नाही. तेथे ना ताळ, ना तंत्र ! स्वातंत्र्य व सौदर्य, प्रेम व सदगुण अशांनी नटलेले जे सुंदर मानवी जीवन, तेच आम्हीही मानतो. असे अज्ञपणे केवळ शारीरिक जीवनात रंगलेले, शरीराच्या गरजा व वासना-विकार यांच्या तृप्तीत गुंतलेले, क्षुद्र मनोवृत्तीचे व विषयभोगाचे जीवन जगण्यातच पुरुषार्थ मानणारे, केवळ उपयुक्तवादाचा व्यवहारधर्म मानणारे असे लोक म्हणत असतात. आजच्या सुसंस्कृत समजल्या जाणा-या जीवनात अति स्थूल, अत्यंत असंस्कृत, सदभिरुचीस न शोभणारा असा रानटीपणा आढळून येतो. शरीरापलीकडे जणू काही नाहीच, पंचविषय म्हणजेच परब्रह्म ! शारीरिक सुखोपभोगांविषयी आज निराळीच एक भावना उत्पन्न झाली आहे. ‘निष्पाप विषयभोग’, ‘दैवी आग’, ‘ते खोल आंतरिक मंदिर’, ‘उदात्त रानटीपणा’, ‘मूळ प्रकृतीचा आवाज’ असे शब्दप्रयोग रुढ होत आहेत. जी जी वृत्ती उठेल ती ती पवित्र मानली जात आहे. अविवेकाला पावित्र्याचे स्वरुप दिले जात आहे.
जगाच्या इतिहासात केवळ आंधळेपणा नाही. ऐतिहासिक तर्कशास्त्र म्हणून काही वस्तू आहे. लॉर्ड अँक्टन बजावतात, ‘केवळ अर्वाचिन चारशे वर्षांच्या पायावर तुम्हाला तत्त्वज्ञान उभारता येणार नाही. पूर्वीची तीन हजार वर्षे वगळून चालणार नाही.’ गत संस्कृतीचे उदयास्त जर आपण परीक्षू तर आपणास असे दिसून येईल की, ज्या ज्या संस्कृतींनी राजकारण, देशाभिमान, परस्परांचे उच्चाटन, यांवर सारा भार दिला, त्या त्या संस्कृती अंतर्गत वा बाह्य कारणांनी नष्ट झाल्या. पाषाणयुगातून युरोपने वर डोकेही काढले नव्हते तेव्हा मिसर, बाबिलोन, असीरिया, क्रीट, खाल्डिआ वगैरे राष्ट्रे किती तरी पुढे गेलेली होती. शंभर वर्षे म्हणजे एक मिनिट असे ठरवून गेल्या सहा हजार वर्षांचा इतिहास घड्याळावर जर आपण मांडला तर कसे बरे चित्र दिसेल ? डॉ. अलेक्झांडर आयर्व्हिन यांनी मोठ्या गंमतीने परंतु परिणामकारक रीतीने ते दाखविले आहे. दोन्ही काटे बारावर आहेत असे समजू या व सहा हजार वर्षांपासूनचा इतिहास सुरु झाला असे मानू या. आता पाहा हं. इजिप्त व बाबिलोन काटे बारावर असता उभी असतात. बारा वाजून पाच मिनीटे होताच क्रीट पुढे येते. बारा वाजून दहा मिनिटे झाली व असीरिया चमकला. सव्वाबारा वाजता खाल्डिआ खडा राहतो. बारा वाजून वीस मिनिटे झाली असता, हिंदुस्थान, चीन व मिडीया येऊन उभी राहतात.( डॉक्टर अलेक्झांडर आयर्व्हिनने अर्थातच हिंदुस्थान व चीन यांच्या संस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयी जे पाश्चिमात्य मत आहे ते येथे घडले आहे.) बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली, पर्शिया पुढे येतो. साडेबारा वाजता ग्रीसचा गौरव. बारा-पस्तीस झाले; तो पाहा अलेक्झांडर नकाशावरील काही साम्राज्ये पुसून टाकीत आहे. आणि बारा वाजून चाळीस मिनिटे होताच रोम राज्य करु लागले. पाऊण वाजता अर्वाचीन युरोपियन राष्ट्रांचा उदयकाळ दिसू लागतो. पुढे दहा मिनिटे तर सारी घाईच आहे. एक राज्य जाते, दुसरे येते. एक साम्राज्य संपते, दुसरे जन्मते, अशा गोष्टी प्रत्येक मिनिटाला होताना दिसतात. आणि एकाला थोडेसे सेकंद असताना १९१४ मधील महायूद्धाची तोफ वाजते! हे असे सहा हजार वर्षांचे चित्र आहे.