Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 3

असे जे परम तत्त्व, त्याचा मानवी मनाला नाना रुपांनी साक्षात्कार होतो. हिंदूधर्मातील देवतांची विविधता पाहा. त्याचप्रमाणे ‘या सर्वांपाठीमागे एक तत्त्व आहे किंवा ते तत्त्व स्थिरचरात भरुनही देशांगुळे उरले’  हा विचार पाहा. बुद्ध धर्मामध्ये अमंग असा निष्ठुर कायदा आहे, तरी त्या धर्मातही कोणी अवतार येतो व वाचवितो हा विचार आहेच. मिसर, बाबिलोन, ग्रीस वगैरे देशांतील त्या नाना देवदेवतांचे खेळ पाहा. आणि हिब्रंचा तो कठोर न्यायप्रिय प्रभू. कॅथॉलिकांचा प्रत्यक्ष देव जरी दूर असला, तरी इतर देवदूत हात देण्यासाठी उभे आहेतच. देवाचे आवडते भक्तही तेथे आहेत. प्रॉटेस्टंट आपला देव आपल्या मनात आणतात. मुस्लिस बंधूंचा तो एकेश्वरी पंथ. अशा या नानाविध मार्गांनी त्या अदृश्य शक्तींशी आपला संबंध जोडण्याचा मानवी मनाने आजपर्यंत प्रयत्न केला आहे. ती शक्ती व्यक्तीपेक्षा महान आहे, अधिक सत्य, शिव व सुंदर आहे, असे सर्वांनी मानले आहे. मानवी स्वभाव विविधतेने नटलेला आहे आणि म्हणून ईश्वराचे स्वरुप विविध असे दिसणे साहजिकच आहे. आपलाच अनुभव खरा किंवा आपलेच म्हणणे खरे, असे जर हे सारे म्हणतील तर त्यांची एकवाक्यता कशी घडवायची ? या सर्व विविध कल्पनांच्या मुळाशी एक अंतिम सत्यता आहे एवढे बारीक खरे. ती अंतिम सत्यता काय आहे, किंरुप आहे, ते आजपर्यंत कोणी सांगितले नाही, पुढेही कोणी सांगेल असे वाटत नाही.

धर्मातील वैवध्य हे पुष्कळ वेळा विरोधाचे निमित्त केले जाते. ही विविधता नष्ट करुन सर्व मानवांचा एक धर्म व्हावा, एतदर्थ प्रयत्न केले गेले व केले जातात. परंतु अशा प्रयत्नांनी भले तर झाले नाहीच, उलट जगातील अशांती व दुःख ही मात्र वाढली. स्वतःचे मत दुस-यावर लादू पाहण्याचा धर्मवेडेपणा काही स्वार्थी लोकांचा स्वभावच असतो. सत्य काय ते फक्त आपणाला मिळाले, विश्वाचा आपण जो अर्थ करु तोच काय खरा, असे मानणे अहंकार आहे. अहंकारामुळे अशी भूल मानवाच्या हातून होते. त्या त्या धर्मातून त्या त्या लोकांचा आत्मा प्रकट होतो. त्या त्या लोकांच्या आंतरिक जीवनाचे स्वरुप त्या त्या धर्मात प्रतिबिंब होते. प्रत्येक जाती किंवा वंश आपापल्या आंतरिक धर्माप्रमाणे विकास करुन घेतो. दिव्यत्व सर्वत्रच आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या विशिष्ट रुपात ते प्रकट होते. ज्या वेळेस दिव्यत्वाचे असे दोन भिन्न आविष्कार समोरासमोर येतात, त्या वेळेस ते एकमेकांवर परिणाम करतात. दोघांतही नवता व भव्यता येते. दुस-यांजवळून जसेच्या तसे घेऊ नये, त्याचे कलम करावे. ते आपणात मिळवून घ्यावे, त्याचे स्वरुप बदलावे. जनाचा धर्म एक करु पाहण्याचा अर्थ नाही. जगाची विविध अशी श्रीमंती, त्याचे हे बहुविध वैभव त्यामुळे कमी होईल. मन जर वांझोटे व्हावयास नको असेल, मनाचा विकास जर स्थगित व्हावयास नको असेल, मानवजातीचा आत्मा डबक्यात पडून राहू नये असे जर वाटत असेल तर कोणत्याही धर्माला नाकारु नका, कोणत्याही धर्माला खोडून काढण्याचा खटाटोप करु नका. राहू देत हे सारे महान धर्म. ‘ईश्वराने ज्यांना ज्यांना रस्ता दाखविला, ते ते सारे त्याचेच आहेत.’

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26