Get it on Google Play
Download on the App Store

सर्वत्र नकार 1

धर्म
पश्चिमेकडे काय किंवा पूर्वेकडे काय, धर्मक्षेत्रात फारच गुंतागुंत झाली आहे. सर्व धर्माची धर्मशास्त्रे ढासळत आहेत. शास्त्रे वाढत आहेत. मानसशास्त्र, समाजशास्त्र, प्राणीशास्त्र, मानवशास्त्र वगैरे शास्त्रे परंपरागत चालत आलेल्या सनातनी धार्मिक कल्पनांना खो देत आहेत. धार्मिक असे जे विविध अनुभव नमूद केले जातात, त्या अनुभवांवरुन, त्या वृत्तांतांवरुन ईश्वर म्हणजे एक भ्रांत कल्पना आहे, तो एक मनाचा खेळ आहे, मानवी हृदयाचे ते एक गोड स्वप्न आहे, असे म्हणण्याची पद्धत रुढ होऊ पाहात आहे. परलोक आहे वगैरे सांगणा-या धार्मिक विभूतींना वेड्यांच्या इस्पितळात पाठवावे, त्यांची मने विकृत असावीत, त्यांच्या मनोरचनेचा अभ्यास केला पाहिजे, असे लोक म्हणू लागले आहेत. ते जुनाट मुद्दे आजच्या मनाचे काडीइतकेही समाधान करु शकत नाहीत. प्रत्येक कार्याला जर कारण असेल, तर ईश्वरालाही कोणी तरी कारण असले पाहिजे. जर ईश्वराला कारणाची आवश्यकता नसेल, तर सृष्टीला तरी का असावी ? हे विश्व किती सदोष, किती अपूर्ण ! सर्वज्ञ व सर्वशक्तिमान प्रभूने का हे विश्व निर्माण केले? शक्यच नाही. ईश्वर म्हणून काही आहे हे इतिहासावरुन सिद्ध होत नाही. लॉइझी म्हणतो, ‘इतिहासकाराने देवाला इतिहासातून घालविले असे नाही; तर त्याला देव मुळी कोठे तेथे दिसलाच नाही.’ कोठे तरी परलोक असेल, समता असेल, तेथे अश्रू पुशिले जातील, जखमा ब-या होतील, असे आपणास वाटते. याचा अर्थ फक्त इतकाच की हे जग वाईट आहे. या जगात अन्याय आहे. ‘तो पाहा तेथे देव आहे, हा पाहा  इकडे आहे’ असे निःशंकपणे सांगण्याइतक कोणताही पुरावा आपणास मिळत नाही. कोठे आहे ईश्वर तो दाखवा, दाखवा त्याच्या खाणाखुणा, असे मानवजात पुकारीत असता त्या देवाने मौन धरुन बसावे, यावरुनच देव नाही असे सिद्ध होते. असे असूनही ईश्वरावरील श्रद्धेला जे धडपडत जोराजोराने चिकटून राहतात, त्यांच्याविषयी आश्चर्य न वाटता उलट वाईट मात्र वाटते. त्यांची कीव कराविशी वाटते. बुडणा-या माणसाने एखाद्या काडीला धरण्यासाठी धडपडावे तसेच हे. स्वार्थी धर्मवेत्ते काहीही म्हणोत, ही श्रद्धा कुचकामी व भंगुर आहे यात शंका नाही.

सा-या धार्मिक विचारप्रक्रिया मानवाच्या भोळेपणावर जगतात. नाना प्रकारच्या दंतकथा व भारुडे निर्मिली जातात. त्यांचा देव रागवतो, तो सूड घेऊ बघतो. हा देव कधी कधी स्वतःच्या शत्रूशीही देवाण-घेवाण करतो, तडजोड करतो. हा क्रोधी देव मानवजातीला कधी खोल दरीत फेकतो, कधी अनंत नरकात लोटतो. परंतु त्याची लहर लागली तर कधी कधी दया करतो, एखादा कृत्रिम उपाय योजतो आणि हा देव हे सारे का करतो? तर जग निर्मिण्यापूर्वी त्याने तसे आधीच ठरवून ठेवले होते म्हणून! जगाच्या बाल्यावस्थेतील या कल्पित कथा आहेत.  आजचे प्रश्न सोडवताना पूर्वीच्या पोथ्या फारशा उपयोगी पडणार नाहीत. प्राचीन धार्मिक ग्रंथांतून आजच्या काळाला अनुरुप अर्थ शोधून काढण्याचे कोणी कोणी प्रयत्न करतात.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26