सर्वत्र नकार 6
जास्तीत जास्त सुख भोगण्याची खटपट करावी. जर जीवनाचा परिपूर्णपणे अनुभव घ्यावयाचा असेल, जीनवात साहस अनुभवायचे असेल, सौंदर्य चाखायचे असेल, सर्वांशाने जगायचे असेल, तर मरण येण्यापूर्वीच या पेल्याचा मनमुराद आस्वाद घेतला पाहिजे. आपल्या वासना-विकारांना लपविणे, आपल्या क्षुद्र सुखांच्या क्षुधांवर पांघरुण घालणे वरील विचारसरणीच्या लोकांना आवडत नाही. ही लपवालपवी व छपवाछपवी शिष्टतेचे किंवा सदभिरुचीचे लक्षण आहे, असेही ते समजत नाहीत. कोणत्याही वृत्तींना उगीच दाबू नका, कोंडू नका. होऊ दे सारे खरे स्वरुप प्रकट. लपंडावाची काय गरज ? जीवन म्हणजे साहस, बेफिकीर वागणे. या जगात आपल्या उत्साहाला स्वैर वाव द्या. मस्तपणे राहणे यातच मौज. कशाची दिक्कत नाही, कशाची पर्वा नाही. जोरदारपणे, बेगुमानपणे जगा. जुनाट नीतिशास्त्रांचे तुणतुणे वाजवणारे बुळे असतात. त्यांचे रक्त सळसळत नसते, म्हणून त्यांना मिळमिळीत व गुळमुळीत जीवन आवडते. बहुजनसमाजाच्या भावना कशा पटकन प्रक्षुब्ध होतात, वृत्ती कशा उत्तेजित होतात, ते या बावळटांना व मेषपात्रांना काय कळे? आपला दुबळेपणा व भित्रेपणा नीतीच्या नावाखाली ते लपवू पाहतात, दुसरे काय? असे हे स्वैर व स्वच्छंद व्यक्तित्वाचे धीट पुरस्कर्ते आहेत. स्वतःच्या वासनांवर कोणताही अंकुश चालविण्यास ते तयार नाहीत. आपल्या मोकाट व भरमसाट जीवनाला कोणी अडथळा केला तर तो त्यांना खपत नाही. नैतिक संयम म्हणजे एक जुनाट बावळटपणाची कल्पना आहे असे ते मानतात. पावित्र्याच्या व धर्मश्रद्धेच्या गोष्टी म्हणजे भोळसटपणा आहे. ज्याला व्यभिचार म्हणतात तो व्यभिचार नसून आंतरिक स्वातंत्र्याचे ते बाह्य प्रतीक आहे. दृढमूल झालेल्या नाना धार्मिक संस्था म्हणजे जीवनाचे शत्रू आहेत. या सर्व धार्मिक संस्था तुडवल्या पाहिजेत. एरव्ही नवीन सामाजिक रचना उभारता येणार नाही.
आर्थिक संबंध
आर्थिक बाबतीत सरकारने ढवळाढवळ करायची नाही हे तत्त्व आता मागे पडले. ‘कारखानदार व कामगार परस्परांशी करारमदार करावयास स्वतंत्र आहेत; स्पर्धेचे स्वातंत्र्यही सर्वांस हवे; ज्या काही भानगडी उत्पन्न होतील त्या आपोआप शमतील,’ असले विचार अतःपर राहीले नाहीत. आपली घडी आपोआप नीट बसवून घेईल अशा प्रकारचे यंत्र समाज नव्हे हे आता कळू लागले आहे. आर्थिक बाबतीत व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने दोन वर्ग निर्माण झाले. मुठभर अशा चंदुलालांचा एक वर्ग व दारिद्र्य आणि दुःख यात खितपत पडलेल्या श्रमजीवींचा, कोट्यावधी कष्टाळुंचा दुसरा वर्ग. ही अशी स्थिती निर्माण होणे अपरिहार्य आहे असे नाही. ज्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, ज्या आपल्या हाती नाहीत, अशा काही बाह्य शक्तींनी व्यक्ती व समाज बनत असतात, असे आज सहसा कोणी मानीत नाही.