'कल्की'च्या निमित्ताने 4
पूर्वीच्या श्रद्धा व मूल्ये ढासळत असून त्या जागी नवी ध्येये व नव्या श्रद्धा आलेल्या नाहीत. कुटुंबव्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यंत्रयुगाने व्यक्तिजीवन लोपत आहे. आर्थिक विषमता दुःख वाढवीत आहे. राजकारणात लोकशाहीला यावे तसे यश येत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारण तर महायुद्धाच्या दिशेने चाललेले आहे, अशा अवस्थेतील मानव समाजाला स्थैर्य मिळवून देण्यास धर्मच कसा उपयोगी पडतो व शरीरापेक्षा आत्माच्या सुखाकडे लक्ष देण्यास तो कसे शिकवतो, प्रत्येक मतदाराचा प्रामाणिकपणा वाढल्याने लोकशाही यशस्वी करता येईल, युद्धाचा संभव केव्हा टळेल व सर्व जगात बंधुभाव कसा निर्माण होईल, या सर्व जिवंत प्रश्नांचा उलगडा राधाकृष्णन्
यांनी १९२९ साली जो केलेला आहे, तो आज १९९८ साली सुद्धा तंतोतंत लागू पडणारा आहे. त्यांनी चर्चेसाठी उपस्थित केलेले प्रश्न आजही, मधल्या काळात दुसरे महायुद्ध घडून गेल्यावर आणि भारत स्वतंत्र झाल्यावरही, किंचित नव्या संदर्भात, तसेच आणि त्याच स्वरुपात भेडसावत आहेत. म्हणजे साधाकृष्णन यांच्या चिंतनाची झेप जशी लक्षात येते, तशीच त्यांनी सुचविलेल्या उपायांची अचूकताही ध्यानात भरते.
या अत्यंत महत्त्वाच्या अशा छोट्या ग्रंथाचा अनुवाद मराठीतील सिद्धहस्त लेखक श्री. साने गुरुजी यांनी स्वातंत्र्यलढ्याची काळी, धुळ्याच्या कारावासात असताना केला. तो ‘संस्कृतीचे भवितव्य’ या नावाने १९४३ साली प्रथम प्रसिद्ध झाला. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती १९४८ साली प्रकाशात आली. त्यानंतर बराच काळ हा ग्रंथ अनुपलब्धच होता. परंतु साने गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा ग्रंथ आता पुन्हा प्रसिद्ध होत आहे, ही आनंददायक घटना होय !
आजच्या बदलत्या जमान्यातील तरुण वाचकांना हा ग्रंथ, चिंतनाच्या संदर्भात, फारच उपयुक्त ठरेल. मराठी वाचक या ग्रंथाचे अगत्याने स्वागत करतील अशी आशा आहे.
-राजा मंगळवेढेकर