पुनर्रचना 1
धर्म
धर्माची पुनर्रचना करण्याचा मोठा प्रयत्न होण्यापूर्वी आधी संशयवादाची प्रचंड लाट येत असते. धर्माची पुनर्घटना करण्याचे सारे प्रसंग पाहा, त्या त्या वेळेस तुम्हाला या गोष्टीचे प्रत्यंतर मिळेल. श्रद्धेचे नवीन बी पुन्हा पेरण्यासाठी परंपरेची जमीन उखळून, नांगरुन ठेवावी लागते. एक महान आंदोलन सुरु होते आणि पडापड सुरु होते. अशा या पडापडीत, अशा या सर्व संसार धांडुळला जाण्याच्या वेळीच जे अचल असते, जे शाश्वत व सत्य असते. जे कशानेही नष्ट होत नाही, उद्ध्वस्त होत नाही, ते डोळ्यांसमोर उभे राहते. सर्व अस्थिराच्या पसा-यात ती स्थिर वस्तू समोर दिसते. धर्मावर टीका होऊ नये असे म्हणण्यात अर्थ नाही. मनाचा कोंडमारा केल्यामुळे मन सुधारेल अशी आशा करु नये. मनाला मोकळपणा द्यावा. यांत्रिक सनातनी धर्म किंवा केवळ धर्मशून्यता यांना भविष्यकाळात स्थान नाही. धर्माची भविष्यकाळात गरज भासणार नाही असे कोणी म्हणतात; परंतु धर्म सदैव राहील. धर्माला दूर करता येणार नाही. ती जी अज्ञात सत्यता, ते जे अननुभूत ब्रह्म, त्याच्याशी संबंध जोडावा असे मानवी हृदयास सदैव वाटत असते. त्या अमूर्तापाशी बसावे, त्या निराकाराजवळ हसावे, अशी भूक मानवी मनास नेहमी राहणार. जोपर्यंत मनुष्य मनुष्य आहे, तो मनन करणारा मानव आहे, जोपर्यंत त्याला जीवनासंबंधी जिज्ञासा आहे, आशा आहे, जोपर्यंत उच्चतर जीवनाची त्याला आकांक्षा आहे व जीवनाच्या कर्तव्यांची जाणीव आहे, तोपर्यंत धर्माच्या नाशाची भीती नाही. तोपर्यंत धर्म आहे. धर्माचे स्वरुप फार तर बदलेल, तो नवीन स्वरुपात मांडावा लागेल. अर्वाचीन ज्ञानाशी व विचारांशी, आजच्या शोधक व डोळस बुद्धीशी ज्या विश्वव्यापक सत्यांचा विरोध नाही, ती सत्ये नवीन स्वरुपात नवीन पद्धतीने मांडावी लागतील. आपले कार्य दुहेरी आहे. आपणास रुढींची बंधनेही तोडावयाची आहेतच. परंतु त्याचबरोबर कशात काही नाही, असे बेछूटपणे म्हणणारी जी स्वच्छंदी अराजक वृत्ती, तिच्याशीही झगडावयाचे आहे.
प्रत्येक वस्तुला काही तरी कारण असते, म्हणून कार्यकारणभावात्मक अशा या सृष्टीलाही काही आदिकारण असेलच, या साखळीच्या सुरुवातीला कोणता तरी आरंभीचा दुवा असलाच पाहिजे, असे जर कोणी म्हटले तर त्याच्या सत्यतेसंबंधी आपण शंका घेऊ शकू; परंतु या विश्वाच्या मुळाशी काही तरी आधारभूत सत् असले पाहिजे, काही तरी मूळ प्रकृती असली पाहिजे, असे जर आपण म्हटले, तर संशय बराचसा कमी होतो. ‘या विश्वाला आदिकारण आहे की नाही, या सर्व पसा-याच्या पाठीमागे काही शक्ती आहे की नाही?’ काही काही तत्त्वज्ञानी अशा प्रश्नांची टिंगलच करतात. व्हॉल्टेअर उपहासाने म्हणे, ‘नाक कशासाठी? चष्मा ठेवण्यासाठी !’ अशाच प्रकारची ही कारणमीमांसा आहे. परंतु खरोखरच का सारे उपहासास्पद आहे ? जर कोणी म्हटले की या विश्वाची व्यवस्था, रचना, गती हे सर्व पाहून असे वाटते की याच्या पाठीमागे काही तरी योजना असावी, कोणता तरी हेतू असावा, हे उगीच, आपाततः सुदैवाने सारे चालले आहे असे नाही, तर त्याच्या म्हणण्याचा विचार नको का करायला ?