Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्रचना 13

आज परंपरागत नीतीविरुद्ध बंड पुकारण्यात आले आहे. जागृत सद्सदविवेकबुद्धीचे हे चिन्ह आहे. काही थोड्याशा व्यक्ती उभ्या राहतात व त्या नीतीत बदल घडवून आणतात. हे निर्भय पुरुष पूर्वग्रह फेकून देतात व खरे काय आहे ते बघतात. आपल्या परंपरेला जे सत्य दिसत असे, तेवढेच काय ते सत्य, त्याहून दुसरे सत्य नाही, असे भासवणारे प्रयत्न परंपरेकडून केला जात असे; अशा त्या परंपरादर्शित सत्याहून अधिक व्यापक असे सत्य या सत्यार्थी वीरांना आढळते. नीतीशास्त्रात क्रांती घडविणारा प्रत्येक सुधारक हा प्रथम पाखंडीच मानला जातो. सनातनी लोक त्याला धर्महीन मानतात. या सनातन्यांना कोणताही बदल नको असतो. डोळस आचाराची त्यांना भीती वाटते. परंपरागत चालत आलेल्या नीतीच्या आरामदायक आलस्यात पडून राहावे असे त्यांना वाटते. चाली रुढीचा शिक्का असणे म्हणजेच नीतिमय असणे आणि त्या रुढीच्या विरुद्ध जो वागेल तो अर्थातच नीतिहीन!  परंतु आजचा हा पाखंडी उद्याच्या पिढीचा देव होतो. उद्याच्या परंपरेचा तो आचार्य होतो. कोणताही काळ घ्या. त्या त्या काळी काही लोक अत्यंत प्रगत अशा जीवनाच्या कल्पनेहूनही पुढे गेलेले आढळतील. काही त्या प्रगत कल्पनेच्या बरेच मागे असलेले आढळतील आणि बहुजनसमाज त्या प्रगत कल्पनेच्या आजूबाजूस असलेला आढळेल. पुढे जाणारे ते बंडखोर असतात, मागे पडणारे गुन्हगार असतात आणि बाकीचे यथातथा असतात. जगातील सारी प्रगती त्या बंडखोरांमुळे होते. गतानुगतिक वृत्तीचे लोक कोणत्याही विचारांचे परीक्षण करणार नाहीत. जसे आले असेल तसेच पुढे चालविणे यातच त्यांचे समाधान असते. दुस-यांच्या कुटाळक्या करीत ते आपला वेळ दवडतात.

दुस-यांविषयी वाईटसाईट गोष्टी ऐकण्यातच त्यांना मजा वाटते. जेठे मारुन बसतील व सा-या गावाच्या उठाठेवी करतील. दुस-यांच्या ज्या गोष्टी ते ऐकतात, त्या गोष्टी काही साध्या नसतात. जीवनाची काही तरी गुंतागुंत त्यात असते. सामाजिक रचनेचे दुष्परिणाम त्यातून दिसत असतात. परंतु त्या जड जरठांना त्याचे काय होय? स्वतःला सदगुणांचे पुरस्कर्ते समजणारे सनातनी जगातील अन्याय दूर करण्यासाठी मात्र कधी उभे राहत नाहीत. अशा सनातन्यांचा काय उपयोग? केवळ यांत्रिक जीवन म्हणजे खडकाळ भूमीवर भटकणे होय! तेथे हिरवळ नाही, हळुवारपणा नाही, कोमलता नाही, सौदर्य़ही नाही! परंपरागत नीतिशास्त्राला चिकटून बसणे वाईट आहे, असे नव्हे. परंतु त्याच्याविषयी हट्ट धरणे मात्र वाईट. परंपरेपासून आपण काही शिकू, आपणास मार्गदर्शन होईल, काही प्रकाश मिळेल. परंपरेच्या खांद्यावर उभे राहून आपण अधिक दूरचे बघू शकू. परंतु परंपराच आपल्या डोक्यावर बसली तर मात्र प्रगतीच खुंटली. परंपरेचा परमेश्वर नका करु. तसे कराल तर दृष्टी अंध होईल आणि आंधळेपणाने वागाल तर अनीतीच्या चिखलात रुताल. कोणतेही नीतिनियम अविचल व अभंग मानाल तर प्रगती अशक्य होईल.

संस्कृतीचे भवितव्य

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
'कल्की'च्या निमित्ताने 1 'कल्की'च्या निमित्ताने 2 'कल्की'च्या निमित्ताने 3 'कल्की'च्या निमित्ताने 4 प्रास्ताविक 1 प्रास्ताविक 2 प्रास्ताविक 3 प्रास्ताविक 4 सर्वत्र नकार 1 सर्वत्र नकार 2 सर्वत्र नकार 3 सर्वत्र नकार 4 सर्वत्र नकार 5 सर्वत्र नकार 6 सर्वत्र नकार 7 सर्वत्र नकार 8 सर्वत्र नकार 9 सर्वत्र नकार 10 सर्वत्र नकार 11 सर्वत्र नकार 12 सर्वत्र नकार 13 सर्वत्र नकार 14 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 3 प्रश्न 4 प्रश्न 5 प्रश्न 6 प्रश्न 7 प्रश्न 8 प्रश्न 9 प्रश्न 10 पुनर्रचना 1 पुनर्रचना 2 पुनर्रचना 3 पुनर्रचना 4 पुनर्रचना 5 पुनर्रचना 6 पुनर्रचना 7 पुनर्रचना 8 पुनर्रचना 9 पुनर्रचना 10 पुनर्रचना 11 पुनर्रचना 12 पुनर्रचना 13 पुनर्रचना 14 पुनर्रचना 15 पुनर्रचना 16 पुनर्रचना 17 पुनर्रचना 18 पुनर्रचना 19 पुनर्रचना 20 पुनर्रचना 21 पुनर्रचना 22 पुनर्रचना 23 पुनर्रचना 24 पुनर्रचना 25 पुनर्रचना 26