शेवट 3
आज वालजीला अस्वस्थ वाटत होते. लिलीची ती आठवण करीत होता. येईल का लिली भेटायला? येईल का देवाला दया?
दिलीपकडे तो मनुष्य आज पुन्हा आला होता. ज्याने वालजीबद्दल विष ओतले तो आज अमृत ओतायला आला होता.
'काय पाहिजे?' दिलीपने विचारले.
'तुमच्याजवळ बोलायचं आहे.' तो नवखा म्हणाला. ते दोघे वर गेले. तो नवखा बोलू लागला, 'महाराज, तुम्हाला मी मागं सांगितलं ते खोटं. केवळ द्वेषामुळं ते मी सांगितलं. वालजी महात्मा आहे. त्या पोलिस अंमलदारानं आपण होऊनच उडी घेतली होती. मी ते पाहिलं होतं. त्यानं उडी नाही घेतली. तो समुद्रात शिरला होता. वालजीचा मी द्वेष करीत असे. ती लिली माझ्याकडे होती. त्यानं माझ्याकडून नेली. तिच्या आईच्या सांगण्यावरून त्यानं नेली. त्याच्याजवळून अधिक पैसे मला पाहिजे होते. त्यानं पैसे न देता माझा अपमान केला. त्या अपमानाचा सूड घेण्याची मी प्रतिज्ञा केली. मी पूर्वीचा खुनी दरोडेखोर. लढाईत मेलेल्या शिपायांच्या अंगावरचे कपडे, दागिने चोरणारा मी. मी पुढं खाणावळ घातली; परंतु ती मोडून वालजीचा सूड घेण्यासाठी मी शहरात आलो. तुमच्या खोलीजवळ मी राहात होतो. वालजीचे तुकडे करणार होतो. परंतु पोलिस आले - जाऊ द्या त्या गोष्टी. वालजी महात्मा आहे. तुम्ही वर्तमानपत्रात मागं नाही वाचलं? एका निरपराधी माणसावर खटला भरला जात होता. वालजी तिथं उभा राहिला. लिलीला विचारा ते सारं, - ती सांगेल. तिला माहित असेल. तुम्हीही वाचलं असेल. तो हा वालजी. जा त्याच्याकडे. तो मरणोन्मुख आहे. मरण समोर येईपर्यंत द्वेष धरावा, कोणाला छळावं? वालजीला का मरतानाही मी दु:ख देऊ? तो मृत्युशय्येवर असतानाही का द्वेष धरू? त्याची तुमची ताटातूट केली हा सर्वात मोठा सूड घेतला. वालजीला रडवलं. माझा सूड संपला. जा तुम्ही. त्याला मरताना भेटा.'