भूत बंगला 6
ती मुलगी घरी गेली. तिने आईबापांना सांगितले की, पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता ते येणार आहेत. आईबाप गुरुवारची वाट बघत होते. गुरुवार आला. सायंकाळची वेळ होती. त्या तरुणाच्या शेजारच्या खोलीतील त्या मुली वगैरे आज घरात नव्हत्या. घरात फक्त नवराबायको दोघे होती. घरात काही तरी घासले जात होते. घराची दारे लावलेली होती. कशाला धार का लावली जात होती? कुर्हाड का कोयता? विळा का सुरा? का बरे? आज धार का लावली जात आहे? त्या तरुणाच्या कानांवर धार लावणे येत होते. तो चमकला. शेजारच्या त्या नवराबायकोस त्याने कधी पाहिले नव्हते. ती घरातून कधी बाहेर पडत नसत. ती छबी त्या तरुणाकडे येई; परंतु अलिकडे बरेच दिवसांत तीही फिरकली नव्हती. ते पाहा धार लावणे ऐकू येत आहे. तो तरुण वर पाहू लागला. दिलीपला प्रकाश दिसला. त्या खोलोतील दिव्याचा प्रकाश होता तो. वरती भिंतीला भोक होते. त्यातून तो प्रकाश येत होता. दिलीपने हळूच टेबल भिंतीजवळ नेले. टेबलावर खुर्ची ठेवली. तो खुर्चीमध्ये उभा राहून त्या भोकातून पाहू लागला. कुर्हाडीला धार लावली जात होती! जवळच एक भटटीही पेटली होती. नवराबायकोचे बोलणेही चालले होते.
'आज घेतो सूड. इतकी वर्षं वाट पाहात होतो. या तापलेल्या सांडशीनं डोळे फोडीन त्याचे. का जीभ भाजू त्याची? या कुर्हाडीनं तुकडे उडवू? मला दया माया नाही. भूत मी. अग, मी तरुणपणी दरोडेखोरच होतो. त्या वेळेस पेंढारी- ठग असत, त्यांच्यात मी होतो. एकदा सत्तावन सालचं ते बंड झालं. त्या वेळेस एक मोठी लढाई झाली. हजारो मुडदे पडले होते. रात्रीच्या वेळी त्या मुडद्यांच्या अंगावरचे दागदागिने पाहायला मी गेलो होतो. एका मुडद्याच्या गळयातील साखळी हाताला लागली. त्याच्या अंगावर दहा मुडदे होते. ते केले दूर. ती साखळी ओढली; परंतु तो मुडदा जागा झाला! ती साखळी घेऊन मी पळालो. तिच्या भांडवलावर तर काढली खाणावळ. तुझ्याबरोबर लग्न केलं. पूर्वी माझी खाणावळ लढवय्याची खाणावळ म्हणून प्रसिध्द होती. लोकांना मी खूप गप्पा सांगे. भिंतीवर लढायांची चित्रं काढीत असे. पुढं पोलिसांनी बंदी केली. तरी अजूनही मला लढवय्या म्हणून मानतात. मी होतो खुनी, दरोडेखोर. आज पुन्हा तसं व्हायचं आहे. समजलीस ना? त्या मुलींना सांगितलं आहे की, आज घरात कुणी यायचं नाही. तो वालजी आला की, त्याला खोली दाखवून तिनं बाहेरच्या बाहेर जायचं, असं हिरीलाही सांगितलं आहे. आज घेतो सूड. त्या मारेकर्याना बोलावलं आहे. ते येतीलच. चौघे आहेत ते. वालजी आला की, या खुर्चीवर त्याला बसवू. दार घेऊ लावून, घालू तोंडात बोळे व टाकू करकचून बांधून आणि मग हा लाल सांडस! ही कुर्हाड! सूड. आज घेतो सूड. रानातील अपमानाचा सूड. 'हा सोटा पाहिलास ना' असं म्हणाला. आज म्हणावं, ही कुर्हाड बघ. कशी छान धार लागली आहे. तुकडे तुकडे करीन बेटयाचे. हालहाल करीन; परंतु आधी मुलीचा पत्ता घेऊ या त्याच्याकडून. तिला मात्र जिवंत ठेवून छळायचं. समजलीस ना?'