प्रेमाचा अंकुर 2
वालजीला वाटले, देवच भेटला. केलेला उपकार कधी कोठे कामाला येईल त्याचा काय नेम सांगावा? एखादे वेळेला उच्चारलेला गोड शब्द, एखादे वेळेस दिलेला आधार, केलेली मदत, कोठे फळास येईल त्याचा काय नेम? म्हणून जगात चांगले पेरीत जावे, ते उपयोगी येईल आज ना उद्या.
वालजी व लिली त्या म्हातार्या रामजीच्या खोलीत गेली. रामजी त्या मठातील बागवान होता. तेथला तो माळी होती. वालजीकडे तो पुष्कळ वर्षांपूर्वी गेला होता. वालजीच्या सांगण्यावरूनच ही नोकरी त्याला मिळाली होती. लिली कढत दूध प्याली. ती झोपी गेली. वालजी व रामजी बोलत होते.
'रामजी, ही लिली काही वर्षं इथं राहिली तर चालेल का?'
'चालेल. इथं आता सार्या संन्यासिनीच राहाणार आहेत. संन्यासी इथून निघून जाणार. त्या संन्यासिनी लिलीला शिकवतील. लिली माझ्याजवळ राहील. मलाही तिची करमणूक होईल.' रामजी म्हणाला.
'परंतु लिलीला संन्यासिनी नाही हो करायचं!' वालजी हसून म्हणाला.
'ते आजच कशाला बोलायचं? लिली मोठी होऊ दे. शिकू दे. मग बाहेर सुरक्षित वाटलं म्हणजे तिला घेऊन जा.'
'मग मी जाऊ? मधून मधून मी भेटत जाईन.'
'आताच जाता? दोन दिवस इथंच लपून राहा. मग जा.'
'बरं.'
दोन दिवस वालजी तेथे लपून राहिला. एके दिवशी तो बाहेर निघून गेला. लिली तेथे मठात राहिली. रामजी तिला स्वत:ची जणू मुलगी मानी. लिलीने फुलझाडे लावली. ती पाणी घाली. रामजीबरोबर काम करी. संन्यासिनींकडे ती शिकायला जाई.
'लिल्ये, किती फुलं केसांत घालतेस? इतकं नटून करायचं काय? तुला संन्यासिनी व्हायचं आहे ना? संसारात पडणार्यांना भूषणं शोभतात. आपणाला एक वैराग्याचा दागिना.' ती मुख्य महंतीण म्हणाली.
'परंतु मला फुलं आवडतात आणि मी जन्मभर का इथंच राहू? ते दिलीप इथंच येतील, ते किती चांगले आहेत!' लिली म्हणाली.