साधू 5
जेवण झाले. ताईने ताट लगेच घासून ठेवले. तो दिवाही तिने पुसून ठेवला. ती भावाला म्हणाली, 'भाऊ, हे कपाटात ठेव.'
'असेना का खालीच. ठेव भिंतीशी.' भाऊ म्हणाला.
'मी आता निजते.' ताई म्हणाली.
'थांब, आपल्या पाहुण्यांना पांघरायला लागेल ना! त्या गाठोडयात एक शाल होती ना? ती दे काढून.'
ताईने शाल काढून दिली. दमलीभागलेली ताई झोपी गेली. साधूने पाहुण्यासाठी स्वच्छ सुंदर अंथरूण तयार केले. त्यावर ती शाल पांघरण्यासाठी ठेवली. नंतर तो त्या पाहुण्यास म्हणाला, 'या, आपण दोघे प्रार्थना करू.' पाहुणा आला. साधू व तो, दोघे शांतपणे बसले. त्या साधूने एक सुंदर प्रार्थना म्हटली. प्रार्थनेनंतर काही वेळ तो साधू डोळे मिटून बसला होता. नंतर तो पाहुण्यास म्हणाला, 'पाहा, आता तुम्हाला उशीर झाला. दमलेभागलेले तुम्ही, शांतपणं झोपा.'
दिवा मालवला गेला. साधू झोपी गेला. पाहुणाही झोपला. रात्री पाऊस फार पडला नाही. त्या झाडाखालून साधूच्या घरी या अनाथ माणसाने यावे, एवढयाचसाठी जणू तो पाऊस आला होता. आता आकाश निर्मळ होते. तारे चमचम करीत होते.
त्या पाहुण्याची एक झोप झाली. तो जागा झाला. त्याला आता झोप येईना. त्याच्या मनात निरनिराळे विचार येत होते. 'किती या साधूचा प्रेमळ स्वभाव! कसं यानं मला वागवलं, जणू मी त्याचा जावई, त्याचा देव! मला चांदीचं ताट, समोर चांदीचा दिवा! खरंच ते चांदीचं ताट खाली भिंतीशी ठेवलेलं आहे. तो दिवाही तिथंच आहे. त्या दोन्ही वस्तू मी लांबवल्या तर? काय हरकत आहे? मी भांडवलाशिवाय उद्या धंदा तरी कोणता करू? जवळ दिडकी नाही. साधूला काय करायच्या या चांदीच्या वस्तू? या झोपडीत चांदी शोभत नाही. पळवाव्या या दोन्ही जिनसा; परंतु ही कृतघ्नता आहे. ज्यांनी इतकं प्रेम दिलं, त्यांच्याच घरी का चोरी करू?