क्रांतीची ज्वाला भडकली 6
ते पाहा कोण आले. चोर की काय?
'काय रे? तुझ्याजवळ काय आहे?'
'काही नाही. हे प्रेत आहे.'
'प्रेताच्या खिशात काय आहे?'
'बघतो. हे पाकीट आहे.'
'दे ते.'
वालजीने दिले. ते दोघे गेले. इतक्यात शिटी ऐकू आली. घोडयाच्या गाडीचा आवाज झाला. गाडी थांबली. तिच्यातून पोलिस व एक अंमलदार खाली आले. ते वालजीजवळ आले.
'हेच ते दोघे.' पोलिस म्हणाले.
'कोण दोघे?' वालजीने विचारले.
'चोर, पळालेले चोर.' पोलिस म्हणाले.
'मी चोर नाही. मी एका मरणोन्मुख माणसाला घेऊन बसलो आहे.'
'कोण, वालजी?' त्या पोलिस अंमलदाराने विचारले.
'होय. आता पुन्हा मी तुमच्या ताब्यात आहे. परंतु एवढं करा, या जखमी तरुणाला तुमच्या गाडीतून न्या. त्याच्या घरी पोचवा. मग मला वाटेल तिकडे न्या.' वालजी म्हणाला. 'हा तरुण म्हणजे दिलीप. त्या श्रीमंत जहागिरदाराचा नातू. तो म्हातारा रात्रंदिवस याची आठवण काढून रडतो. त्याच्याकडे याला पोचवतो. चला, तुम्हीही बसा गाडीत.' अधिकारी म्हणाला.
गाडी चालली. त्या जहागिरदाराच्या बंगल्यावर थांबली. त्याला हाका मारण्यात आल्या. म्हातारा खाली आला. 'काय आहे?'
'हा तुमचा नातू घ्या. तो जखमी झाला आहे. जपा.'
'माझा नातू? कुठं आहे तो? जखमी झाला? कुठं आहे तो?
'थांबा, घाई नका करू.'
त्या सर्वांनी दिलीपला वर नेले. तेथे खाटेवर ठेवून तो अंमलदार व वालजी खाली आले. गाडी निघाली.
'हे पाहा, वाटेत माझी खोली आहे. तिथं लिली आहे. तिला शेवटचा निरोप देईन. लगेच परत येईन. मग मला कुठंही न्या. फाशी द्या किंवा अंदमानात पाठवा. एवढी प्रार्थना मान्य करा.' वालजी त्या अधिकार्याला म्हणाला.
'बरे.' तो अधिकारी म्हणाला.
गाडी थांबली. वालजी आत गेला. त्याने लिलीला उठवले. त्याने लिलीला सारे सांगितले. लिली रडू लागली.
'रडू नको. दिलीप वाचेल. दोघं सुखानं राहा. गरिबांवर प्रेम करा. लिल्ये, जातो हो मी. माझी आठवण ठेव.' असे म्हणून तो निघाला; परंतु तो रस्त्यात येऊन पाहातो, तो तेथे गाडी नाही! कोठे गेली गाडी? कोठे गेला अंमलदार? त्याने उपकार स्मरून का वालजीसही सोडले?