साधू 2
'पैसे आहेत का रे भिकार्या?'
'आहेत दोन आणे.'
'दोन आण्यांत काय देऊ?'
'जे देता येईल ते द्या.'
इतक्यात कोणीतरी त्या हॉटेलात आला. तो मालकाच्या कानात काही पुटपुटला व निघून गेला.
'ए भिकार्या, इथं नाही तुला काही खायला मिळणार. इथून चालता हो, असशील चोरबीर. खाशील दोन अण्यांचं परंतु नेशील दोन हजारांचं. मोठे हुशार असता तुम्ही या कामात. चल नीघ, ऊठ.'
'एवढं खाऊन जाऊ दे. पुढं आणलेला घास मागं नेऊ नका.'
'ते काही नाही, तू आधी ऊठ.'
तो भिकारी बाहेर पडला. तो आणखी एका हॉटेलात शिरला; परंतु तेथेही मघासारखाच अनुभव आला. त्याला कोणत्याही खाणावळीत किंवा हॉटेलात जागा मिळेना. शेवटी एका मोठया घराच्या बाहेरच्या ओटयावर तो बसला. थोडया वेळाने तेथेच पडून राहिला; परंतु मालकाचा भय्या बाहेर आला. तो कुत्र्यापेक्षाही मोठयाने अंगावर गुरगुरला. त्याने त्या अनाथाला हाकलून दिले.
आता तो गरीब बापडा गावाबाहेर निघाला. या गावात आपणास कोणीही निवारा देणार नाही असे त्याला वाटले. गावाबाहेर जावे, एखाद्या झाडाखाली पडावे असे त्याने ठरवले. तो आता दमून गेला होता. पोटात अन्न नव्हते, तरी चालत होता. शेवटी एका झाडाखाली तो बसला. त्याच्या डोळयांतून पाणी आले. तुरुंगातून सुटल्यावरही हे पोलिस का सारखे मागे, का यांचा ससेमिरा, असे त्याच्या मनात आले. एकदा चोर म्हणजे का कायमचा चोर? आम्हाला या जगात मग कोठेच का आधार नाही मिळायचा? अशा विचारात तो होता.
परंतु त्याचे अश्रू पाहून आकाशाला जणू वाईट वाटले. आकाशाचे तोंड काळवंडले. एकाएकी ढग जमा झाले. तारे दिसेनासे झाले. टप् टप् असा जाड थेंबांचा पाऊस पडू लागला. वाराही जोराने वाहू लागला. देवही आपल्या पाठीस लागला आहे असे त्या दुर्दैवी माणसास वाटले. देवाच्या आकाशाखाली तरी रात्रभर पडू, असे त्याला वाटत होते; परंतु ते आकाशही का रागावले? माझ्याखाली निजू नको, भिजवून टाकीन, नाही तर ऊठ, असे का आकाश त्याला सांगत होते?