तो तरुण 2
'तुमची मुलगी तुमच्या घरी ठेवा. तुमचा नातू तुमच्याजवळ ठेवा. मी एकटा राहीन. माझं ध्येय व मी. जातो मी.'
असे म्हणून जावई गेला तो गेला. तो पुन्हा सासर्याकडे आला नाही. त्या जहागिरदाराची मुलगी माहेरीच राहू लागली. तिचा मुलगा तिच्याजवळ होता. म्हातारा नातवावर फार प्रेम करी. सारी इस्टेट तो नातवालाच देणार होता.
नातू मोठा झाला. तो शिकू लागला. त्याच्या अभ्यासाची स्वतंत्र खोली होती. त्या खोलीत सुंदर सुंदर वस्तू होत्या. सुंदर चित्रे होती. नातवाचे नाव दिलीप होते. दिलीप रात्रंदिवस वाचीत बसे. आपला नातू खूप अभ्यास करतो, याचे आजोबाला कौतुक वाटे; परंतु दिलीप का अभ्यास करीत असे? त्याला वाचनाचे वेड लागले. विशेषत: इतिहासाची त्याला गोडी लागली. जगातील सर्व देशांचे इतिहास त्याने वाचले. जगातील राज्यक्रांत्यांचे इतिहास वाचले. हिंदुस्थानचा इतिहास तर त्याने नीट अभ्यासला. तरुण दिलीप क्रांतिकारक झाला.
तरुणांचे एक मंडळ स्थापिले गेले. त्यात दिलीप प्रमुख होता. दिलीप आर्थिक मदत करी. मंडळाचे ग्रंथालय होते, मंडळाची एक भाडयाची जागा होती. तेथे तरुण जमत, चर्चा करीत. ते तरुण मुंबई शहरातील कामगारांत जात. मुंबईत नवीन गिरण्या सुरू झाल्या होत्या. कामगारांचे हाल होत होते. बेकार लोकांच्या झुंडी खेडयापाडयांतून मुंबईत येत व भटकत. हे तरुण त्यांच्यात जात. त्यांच्यात क्रांतीच्या गोष्टी बोलत.
या तरुणांच्या बैठकी कधी कधी रात्रभर चालत. दिलीप मग तेथेच झोपे. दुसर्या दिवशी घरी येई.
'दिलीप, रात्री कुठं होतास?'
'आम्ही अभ्यास करीत होता.' तो उत्तर देई.
'प्रकृती सांभाळून अभ्यास कर बाळ.' असे म्हातारा प्रेमाने म्हणे.
एके दिवशी दिलीपच्या हातात म्हातार्याने एक पत्र दिले. दिलीपने ते वाचले. 'माझ्या बाबांचं पत्र.' तो म्हणाला.