भूत बंगला 7
खाणावळवाला कुर्हाडीला धार लावता लावता बायकोजवळ असे बोलत होता. दिलीप त्या झरोक्यातून बघत होता, ऐकत होता. तो भयंकर प्रकार पाहून त्याला कसे तरी वाटले. 'कोण मनुष्य? माझ्या बाबांना वाचवणारा तो हाच मनुष्य की काय?' बाबांनी पत्रात लिहिलं होतं, 'माझ्या अंगावरचे मुडदे एकानं दूर केले. मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले.' हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला; परंतु न कळत बाबांना वाचवता झाला. शूरांच्या अंगावरचे कपडेलत्ते नेणारा मांग, लांडगा; परंतु त्यानं बाबांना वाचविलं आणि बाबांनी सांगितलं आहे की, त्याला प्रेम दे, साहाय्य कर, हा तर आज इथं कोणाचा तरी हालाहाल करून वध करणार आहे. माझं कोणतं कर्तव्य? पोलिसांना वर्दी देणं हे.'
दिलीपने पोलिसांस सारे सांगितले. तो घरी परत आला. त्याने आपले पिस्तुलही तयार करून ठेवले. जर पोलिस वेळेवर नाही आले, तर झरोक्यातून गोळया घालण्याचे त्याने ठरवले.
रात्र होत आली. भूत बंगला भुतासारखा दिसू लागला. दहा वाजायची वेळ होत आली. ते पाहा कोणी तरी चार बुरखेवाले त्या खोलीत गेले आणि तो वालजी येत आहे. हिरी बाहेर उभी आहे.
'इकडे इकडे. या खोलीत आता आम्ही राहातो.'
'याच खोलीत मीही राहात असे.'
'खरं का?'
'हो. तिसर्या मजल्यावरची खोली. रस्त्यावरच्या खिडकीतून लिली नेहमी गंमत पाहायची. तिला मी बाहेर जाऊ देत नसे. मग ती नेहमी खिडकीत बसे.'