साधू 8
साधूच्या घराला कधी कुलूप नसे. तो प्रथम कडी लावी; परंतु पुढे कडी-कोयंडेही त्याने काढून टाकले. 'आपल्याला कसलं भय? आहे काय आपणाजवळ?' असे तो म्हणे. एखादे वेळेस ताई त्याला रागावे. 'तुला व्यवहार अगदीच कळत नाही' असे म्हणे; परंतु साधू हसे, गोड हसे.
आजही साधूचा तो कार्यक्रम सुरू झाला. तो फुले तोडीत होता. घरात ताई उठली. तिने चूल सारवली. सडासारवण तिने केले. ती चांदीची भांडी नीट पुसून कपाटात ठेवावी म्हणून ती आली. चांदीची भांडी दिसत ना! तो पाहुणाही कोठे दिसेना. 'भाऊ, अरे भाऊ!' तिने हाक मारली.
'काय ग ताई?'
'ते पाहुणे कुठं गेले?'
'अकस्मात आले. अकस्मात गेले. आपल्याकडून त्यांची अधिक सेवा व्हायची नव्हती. दुर्दैव आपलं.'
'खरंच दुर्दैव. अरे, तो लफंग्या होता. बहुतकरून चांदीचं ताट व दिवा घेऊन गेला! घरात दोन्ही वस्तू नाहीत. चोर असावा तो.'
'तरी तुला कधीपासून मी सांगत होतो की, या दोन वस्तू विकून टाकाव्या व पैसे गरिबांना द्यावे; परंतु तू ऐकलं नाहीस. प्रेमाच्या देणग्या का कुणी विकतो, असं आपलं तुझं सदानकदा सांगणं. आपल्या घरात त्या वस्तू होत्या, म्हणून ना चोरी करण्याचा त्या पाहुण्याला मोह झाला? आपणच वाईट. गरीब लोक जगात उपाशी असता घरात सोनं-चांदी ठेवण्याचा अधिकार काय? ती गरिबांना रोटी आपण चोरून ठेवली होती. ताई, बरं झालं. घर निर्मळ झालं! आपल्यामुळं त्या पाहुण्याच्या हातून चूक झाली. आपला दोष; परंतु आता काय करायचं? असो.'
''तू घरात वाटेल त्याला घेतोस. मनुष्य कोण कसा असेल याचा विचारही तू करीत नाहीस. तू अगदी बावळट आहेस. जरा तरी विचार नको का करायला?'
'ताई, आपण स्वत: वाईट नाही ना वागत, एवढाच माणसानं विचार करावा! दुसर्यांची चिकित्सा मी कशाला करू? मला माझं जीवन निर्मळ करू दे. जगाला आपण चांगलंच म्हणावं. आपली श्रध्दा जगावर लादावी. आपला संकल्प जगावर लादावा. त्याचा आज ना उद्या केव्हा तरी परिणाम होईल. आपण अविश्वासी माणसावरसुध्दा विश्वास टाकावा. त्याचा केव्हा तरी सत्परिणाम झाल्यावाचून राहाणार नाही. मनुष्याला सुधारायला हाच मार्ग. असो. मी आता जातो.'