अघटित घटना 13
हळुहळू माझी भरभराट झाली. ज्या शहरात मी हल्ली राहातो तिथं आलो. तिथं कारखाना घातला. बेकारांना काम मिळावं म्हणून उद्योग आरंभिले. चोरी करणारा चोर नसतो. समाजरचना रद्दी आहे, त्यामुळं चोर्या होतात. मनुष्याला वाईट करायला कोणी लावीत असेल तर तो समाज होय. मी त्या स्थितीतून गेलो होतो. म्युनिसिपालटीतर्फे परिश्रमालये मी उघडली आहेत. बेकारानं तेथे यावं, काम करावं. अनाथांसाठी मी दवाखाने घातले आहेत. सार्वजनिक बागा उभारल्या आहेत.'
'परंतु आता काय! आज पुन्हा मी पळून गेलेला चोर म्हणून जगासमोर उभा राहात आहे. पुन्हा मला पोलिस पकडतील. माझं सारं कर्तृत्व विसरतील. त्या कर्तृत्वाचा मला अभिमान नाही. त्या साधू पुरुषाचा तो आशीर्वाद आहे. ज्यांना चोर चोर म्हणून तुम्ही वर्षानुवर्षे डांबून ठेवता त्या चोरांच्या अंगात केवढं कर्तृत्व असतं हे माझ्या उदाहरणावरून पाहा. चोरांस आदरानं वागवा. समाजात त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असं करा, म्हणजे चोर्या होणार नाहीत.'
'त्या निरपराधी माणसाला सोड. माझ्यासाठी. त्याला त्रास झाला. मी त्याच्याजवळ क्षमा मागतो.'
असे म्हणून तो उदार पुरुष जायला निघाला. सारे तटस्थ होते. सर्वांनी त्याला रस्ता दिला. त्याच्या त्या माहात्म्याने सर्वांस दिपविले. थोर कृत्याचा जादूसारखा परिणाम होतो. एक तेजस्वी किरण येतो व सारा अंधार प्रकाशमय होतो. त्या उदार पुरुषाला पकडावयाला कोणी पुढे झाला नाही. जो तो एका उच्च वातावरणात गेला. घोडयावर बसून तो महात्मा निघून गेला. नंतर काही वेळाने सारे भानावर आले.
'तुमचा खटला खोटा ठरला!'
'चूक झाली महाराज. हा मनुष्य वालजी नव्हे. पळून गेलेला वालजी आता बोलत होतो तो. या माणसावरचा खटला आम्ही काढून घेतो,' पोलिस अधिकारी म्हणाला.
'यापुढं जपा. वास्तविक तुम्हाला शिक्षा केली पाहिजे असे खोटे खटले भरण्याबद्दल. जा.' न्यायाधीश म्हणाले.
तो निरपराधी मनुष्य मुक्त झाला. त्या उदार पुरुषाला धन्यवाद देत तो निघून गेला.