अटक 3
'संन्यासिनीच्या शब्दांवर मी विश्वास ठेवतो. मी जातो. झडती घेत नाही. प्रणाम!' असे म्हणून तो पोलिस अधिकारी गेला.
काही वेळा गेला. वालजी खाटेखालून बाहेर पडला. त्याने संन्यासिनीचे आभार मानले.
'सार्या जन्मात आज खोटं बोलले,' ती म्हणाली.
'देव रागावणार नाही,' तो म्हणाला.
वालजी हळूच बाहेर पडला. तो बोळातून, अंधारातून, लपत छपत, सावधानपणे जात होता. पोलिसांचा सुळसुळाट जरा कमी होता. पोलिसांनी गावाबाहेर जाणारे रस्ते रोखून धरले; वालजी दवाखान्यात आला. रात्रीचे बारा वाजून गेले असतील. मध्यरात्री नगराध्यक्ष आले हे पाहून दाया, नोकर-चाकर चपापले.
'ती स्त्री कशी आहे?' त्याने विचारले.
'तिची आशा नाही. 'माझी मुलगी. माझी मुलगी' एवढंच ती म्हणते. घटका- दोन घटकांची ती सोबतीण आहे.' मुख्य दाई म्हणाली.
'कुठं आहे ती?'
'या बाजूला.'
वालजी लिलीच्या आईजवळ गेला. तो तिच्याजवळ बसला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.
'लिलीला आणलंत? कुठं आहे ती?' तिने क्षीण स्वरात विचारले.
'मला जायला झालं नाही, आणीन हो तिला.' तो म्हणाला.
'आणीन! आणलं नाहीत ना? आता का मी जगणार आहे ती येईपर्यंत? जाऊ दे. देव आहे तिला. लिले, देव हो तुला -' असे म्हणून तिने निराशेने हात आपटले. तिने लगेच डोळे फिरवले. लिलीला पाहाण्यासाठी डोळे उघडे होते. आता ते मिटत चालले. नाडी सुटत चालली. शेवटची लक्षणे दिसू लागली. लिलीच्या आईने राम म्हटला.
वालजी सदगदित झाला. तो म्हणाला, 'लिलीच्या आई, तुमच्या मुलीचा मी सांभाळ करीन. तुम्ही सुखानं स्वर्गात जा. तुमच्या आत्म्याला शांती मिळो! मी शक्य ते लिलीसाठी करीन. तिच्या सुखासाठी प्राणही फेकीन.'
त्याला तेथे थांबण्याची आता आवश्यकता नव्हती. त्या अभागिनीच्या प्रेताच्या व्यवस्थेसाठी त्याने पैसे दिले. तो निघाला तेथून. कोठे गेला तो? तो पोलिसचौकीवर गेला. सारे स्तब्ध राहिले.
'मला ना पकडायचं आहे? हा मी आलो आहे. पकडा मला!' तो म्हणाला. पोलिस अधिकारी तेथे आला. वालजीला पकडण्यात आले. जड शृंखला त्याच्या हातापायांत घालण्यात आल्या. उदारांचा राणा, अनाथांचा आधार पुन्हा एक चोर झाला.