तो तरुण 4
ते पत्र दिलीपने कितीदा तरी वाचले. त्याने मनाशी काही तरी ठरविले. पित्याच्या सांगण्याप्रमाणे तो वागू लागला. आधीपासूनच तो क्रांतिकारक होता. आता त्याच्या वृत्तीत उत्कटता आली. निश्चितता आली. तीव्रता आली. त्याने कागद, लिफाफे छापून आणले. त्या कागदांवर 'क्रांतीचा जय असो' अशी वर वाक्ये असत. क्रांतीचा झेंडा छापलेला असे. त्याने पित्याचे ते पत्र एका सुंदर चंदनी पेटीत रेशमी रुमालात गुंडाळून ठेवले. त्या पत्रावर तो रोज गुलाबाच्या फुलाच्या पाकळया वाही. त्या पत्राला प्रणाम करी.
आजोबाला नातवाच्या वर्तनाचा संशय येऊ लागला. दिलीप अलिकडे घरी फारसा नसे. आजोबांशी किंवा आईशी पूर्वीप्रमाणे तो प्रेमळपणाने बोलत बसत नसे. एके दिवशी आजोबा त्याच्या खोलीत गेले. त्यांनी तेथील पेटी उघडली. तो ते छापलेले कागद, ते छापलेले लिफाफे. 'क्रांतीचा जय असो' वगैरे ती ब्रीदवाक्ये. क्रांतीच्या झेंडयाची ती खूण. आजोबा संतापले. ते बिथरले. त्यांनी त्या कागदांच्या चिंधडया केल्या. ते आणखी पाहू लागले. तो ती चंदनी पेटी. त्यांनी ती उघडली.रेशमी रुमालात ते पत्र. ते पत्र त्यांनी वाचले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जिंवतपणी याच्या बापाला मी करू दिले नाही, ते त्याने मरताना केले. या पत्रामुळे हा पोरटा बिघडला. म्हातार्याने ते पत्र फाडले. त्याने ती चंदन पेटी कोपर्यात भिरकावली.
इतक्यात दिलीप येऊन तेथे उभा राहिला.
'आजोबा, तुम्ही हे काय केलंत? हे पत्र फाडलंत! मला प्राणाहून प्रिय असलेलं पत्र तुम्ही फाडलंत. या पत्राच्या नाही तुम्ही चिंधडया केल्यात, माझ्या शरीराच्या केल्यात. का हा दीर्घद्वेष? पित्याची मरताना तुम्ही भेटही होऊ दिली नाहीत. पित्याचं उभ्या जन्मात मला दर्शन होऊ दिलं नाहीत. माझी आठवण करीत माझे बाबा गेले. माझ्यासाठी त्यांचे प्राण घुटमळत असतील; परंतु तुम्ही ते पत्र मुद्दाम उशीरा दिलंत. पितापुत्रांची ताटातूट केलीत आणि पित्याची आठवण म्हणून असलेलं हे एक पत्र, ही पित्याची शेवटची इच्छा, शेवटची आशा- तीही पायांखाली तुडविलीत. दुसर्याच्या भावना म्हणजे का कचरा? असे कसे तुम्ही! इतकी कशी तुमची कठोर हृदयं? श्रीमंतीनं, जहागिरीनं अशी दगडासारखी मनं होणार असतील तर आग लागो त्या श्रीमंतीला!'
दिलीप थरथरत होता. पित्याच्या पत्राचे तुकडे तो गोळा करू लागला.
'दिलीप खाली ठेव ते तुकडे. त्यांना काडी लाव. माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या इच्छेप्रमाणं वाग. नाही तर तुला दाही दिशा मोकळया आहेत.' आजोबा करारी आवाजात म्हणाले.
'ठीक. मी जातो. हे पत्राचे तुकडे हीच माझी खरी संपत्ती. ही संपत्ती घेऊन जातो. हे अंगातील कपडे असू देत. नेसूचं धोतर असू दे. तितकी भीक घाला. मी जातो.' असे म्हणून दिलीप निघाला. ते पत्राचे तुकडे खिशात घालून निघाला. आजोबा, आई यांना सोडून ध्येयाची पूजा करायला तो बाहेर पडला.
आजोबा तेथेच उभे राहिले. त्यांनी बाहेर दारात जाऊन पाहिले. त्यांनी रस्त्याकडे पाहिले; परंतु दिलीप केव्हाच दूर गेला होता.