तो तरुण 3
'हो. ज्याचं तोंड तू कधी पाहू नयेस असं मला वाटे त्याचं पत्र.'
'मला आधी का दिलं नाहीत? बाबा जिवंत असतील का? मरताना मला भेटण्याची त्यांना इच्छा होती. माझे बाबा. मी त्यांना कधी पाहिलं नाही. तुम्ही ताबडतोब का दिलं नाही हे पत्र? मरतानासुध्दा का मनात अढी धरायची?'
दिलीप ते पत्र घेऊन बाहेर पडला. त्या पत्रातील पत्त्याप्रमाणे तो गेला. तो जिना चढू लागला. त्याच्याने चढवेना. त्याचे प्राण जणू गळून गेले होते. असतील का बाबा जिवंत? तो वर गेला. तो काय? ती खोली रिकामी होती! 'माझे बाबा!' त्याने टाहो फोडला.
'तुझे बाबा तुझी आठवण करीत गेले. त्यांचं प्रेत सकाळी नेण्यात आलं. तुझ्यासाठी लिहिलेलं एक पत्र त्यांच्या उशाशी होतं. हे घे ते पत्र.' शेजारचे सदगृहस्थ म्हणाले.
दिलीपने ते पत्र मस्तकी धरले. ते पत्र त्याने खिशात ठेवले. तो त्या रिकाम्या खोलीत शून्य मनाने बसला. तो इकडे तिकडे बघत होता. कोठे तरी पिता दिसेल असे का त्याला वाटत होते? बाबा, कोठे गेले बाबा, असे हात वर करून तो म्हणे. त्याने त्या खोलीला साष्टांग प्रणाम केला. त्या खोलीत डोळे मिटून तो बसला. पित्याची काल्पनिक मूर्ती का तो घडवीत होता? मनोमंदिरात ठेवू पाहात होता?
शेवटी तो उठला. तो पुन्हा आपल्या आजोबांच्या घरी आला. तो आपल्या खोलीत बसला. त्याने आतून कडी लावून घेतली. त्याने पित्याचे ते पत्र अत्यंत भक्तिभावाने फोडले. काय होते त्या पत्रात?
'चिरंजीव प्रिय दिलीप,'
बाळ, तुझी माझी भेट होईल की नाही देवाला माहीत; परंतु माझी भेट न झाली तर मरणार्या पित्याची शेवटची इच्छा तुला कळवावी म्हणून हे पत्र मी लिहून ठेवीत आहे. तुझ्या पित्याच्या दोन इच्छा आहेत :
तू गरिबांची बाजू घेणारा हो. गरिबांसाठी क्रांती करणारा हो. जुन्या रूढी, जुनी समाजरचना यांना मूठमाती देण्यासाठी उभा राहा. क्रांतीचा झेंडा हाती घे.
दुसरी गोष्ट म्हणजे मागे स्वातंत्र्ययुध्दात लढताना मी जखमी होऊन पडलो होतो. माझ्या अंगावर अनेकांचे मुडदे पडले होते. त्यांच्या खाली मी गुदमरलो होतो; परंतु मध्यरात्रीची वेळ असेल, कोणी तरी त्या वेळेस आले. माझ्या गळयातील सोन्याची साखळी काळोखात कोणी तरी ओढली. माझ्या अंगावरचे मुडदे त्याने दूर केले. ती साखळी घेऊन तो गेला. तो का चोर होता? कोणी का असेना, परंतु मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले. हळुहळू उठून मी निसटून आलो. माझे प्राण वाचवणारा तो अज्ञात इसम जर कधी काळी तुला भेटला तर त्याला प्रेम दे. त्याला जरूर पडली तर मदत दे, साहाय्य दे. बाळ, या तुझ्या पित्याच्या दोन इच्छा. आशीर्वाद. गरिबांसाठी झगड. चांगला हो, मोठा हो.'