भूत बंगला 3
वालजीच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट चुकली नाही. त्याने एके दिवशी बिर्हाड बदलले. तो अन्यत्र राहावयास गेला. ज्या खोलीत वालजी राहात होता, त्या खोलीत ज्यांचे भाडे त्याने देऊन टाकले होते ते बिर्हाड आले.
त्या बिर्हाडकरूची आपणास माहिती हवी. त्याला तीन मुली आहेत. एक मुलगा आहे. त्याची बायको आहे. किती दिवस झाले त्यांना मुंबईत येऊन? कोणाला माहीत? अत्यंत दरिद्री अशी त्यांची अवस्था असावी. त्यांच्या खोलीत सामान फार नाही. एकदोन खुर्च्या आहेत. थोडी भांडीकुंडी. त्या मुलीची आई दिसायला उग्र होती आणि त्या मुलीचा बाप, तोही भेसूर दिसे. त्या आईबापांना हसताना कोणी पाहिलं नसेल. हसणे जणू त्यांना माहीतच नव्हते. नेहमी दुर्मुखलेली त्यांची तोंडे.
मोठी मुलगी मोलमजुरी करायला जाई. ती असेल सोळा सतरा वर्षांची. तिच्या पाठची, असेल चौदा पंधरा वर्षांची. तिच्याहून लहान ती दहा वर्षांची आणि मुलगा सातआठ वर्षांचा असेल.ती चौदापंधरा वर्षांची मुलगी आहे ना? ती फार सुंदर नाही; परंतु एक प्रकारचा प्रेमळ भाव तिच्या डोळयांत आहे. त्यामुळे तिच्या चेहर्याला थोडी मोहकता आली आहे. तो जो तरुण शेजारच्या खोलीत राही, त्याच्याकडे ती सारखी बघत राहायची. एके दिवशी ती त्याच्या खोलीत गेली. एकदम त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि समोरच्या आरशात पाहू लागली.
'मी वाईट आहे का हो? ती मागं इथं मुलगी राहात असे तिच्याहून मी वाईट आहे?' तिने विचारले.
'तू केव्हा पाहिलीस ती मुलगी?' त्याने विचारले.
'शंभरदा पाहिली आहे. तिचा तो म्हातारा श्रीमंत आहे, नाही? तिला चांगले कपडे मिळतात. कपडे चांगले असले म्हणजे कुरूप मनुष्यसुध्दा चांगलं दिसतं, नाही? माझे कपडे हे असे! मी कशी बरं सुंदर दिसेन? परंतु मी का फार वाईट आहे?'
'तू किती वटवट करतेस?