अभगिनी व तिची लहान मुलगी 2
'कोणती शंका!' त्याने विचारल.
'तुम्ही माझा एक दिवस त्याग कराल. तुम्ही मला सोडून जाल. का असं मनात येतं ते कोणास कळे! नाही ना मला टाकणार? नाही ना अंतर देणार?'
'ती पाहिलीस वेल? त्या झाडाला कशी घटट विळखा घालून बसली आहे. ती तुटेल, मोडेल, परंतु झाडाला आपण होऊन सोडणार नाही.'
'वेलीनं झाडाला घट्ट धरून ठेवलं आहे; परंतु झाडाचा काय नेम? तो वृक्ष दुसर्या वेलीही जवळ करतो. काही वेली गुदमरतात, काही हसतात. झाडाला काय त्याचं?'
'आपणा दोघांमध्ये कायमचं प्रेमाचं नातं जोडणारी लिली नाही का? लिली आपणास एकमेकांपासून दूर होऊ देणार नाही.'
'लिलीला बरोबर आणलं नाही. घरीच ठेवून आले. आई, आई म्हणत असेल. आता दोन-तीन वर्षांची झाली. तीन वर्षं. तीन वर्षं आपण प्रेमात दवडली. अशीच सारी जातील का? असाच हा जन्म जाईल का, पुढील जन्म जातील का? तुम्ही मला तुमच्या राहात्या घरी केव्हा नेणार? विचारलं का वडिलांना? किती दिवस त्या वस्तीत मी राहू? सांगा ना.'
'नेईन. लवकरच नेईन. बाबांच्या कलानं घेतलं पाहिजे. त्या दिवशी माझ्यावर रागावले. नीट राहायचं असेल तर घरी राहा, नाही तर चालता हो. व्यापारात लक्ष घाल. उडाणटप्पूपणा किती दिवस चालायचा? सारी फुलपाखरं आता सोडून दे, वगैरे कितीतरी बोलले. हे बघ, बाबांनी घालवलं तर उद्या आपण कुठं जाणार? गरिबीत राहायची मला सवय नाही. जरा दमानं घे हो.'
'पैसे काय करायचे? आपण गरिबीतही राहू. मी मिलमध्ये कामाला जाईन. तुम्हाला कष्टाचं काम होणार नाही. तुम्ही घरी राहा; परंतु आता दूरदूर नको. खरंच नको.'
'बरं, विचार करू.'
असे त्यांचे बोलणे चालले होते. त्या दुसर्या जोडप्याचे काय चालले आहे बोलणे? प्रियकरांचे विश्रब्धापलाप ऐकू नयेत. त्यांची मोकळी मने त्या वेळेस बोलत असतात; परंतु आपण ऐकू या. आपणाला त्यांचा हेवा ना दावा. जगात कसे प्रकार असतात ते पाहायचे आहे.