भूत बंगला 5
'भाडं थकलं आहे. आई आजारी आहे. बाबांना दमा लागतो. मी एकटी मोलमजुरी करते. तुम्ही काही मदत करता का?'
'किती हवी मदत?'
'द्याल तितकी थोडीच आहे.'
त्याने खिशात हात घातला. पंधरा रुपये होते ते त्याने दिले. त्या मुलीचे तोंड फुलले.
'किती तुम्ही उदार!'
'तुला मदत लागेल तेव्हा मागत जा.'
'परंतु तुम्ही कुठं भेटणार?'
'असाच या बाजूला कुठं तरी.'
ती निघून गेली. तिने घरी आईबापांना ती गोष्ट सांगितली.
'पुन्हा भेटले तर त्यांना सांग की, आमच्या घरी या. त्यांना म्हण की, आमच्या आईबापांना भेटायला या. तुम्ही आलात तर त्यांना किती तरी बरं वाटेल.' बाप म्हणाला.
'कोणत्या दिवशी येणार ते ठरवून ये.' आई म्हणाली.
काही दिवस गेले. पुन्हा एकदा वालजीची व त्या मुलीची भेट झाली.
'काय ग, कसं आहे तुझ्या आईबापांचं?'
'तुम्ही या ना आमच्या घरी. आमचं कुणी नाही दुसरं. या शहरातून कुणी कुणाचं नाही. इतकी वर्षं आम्हाला येऊन झाली; परंतु कुणाशी ओळख ना देख. घरंही कितीदा बदलली. भाडं देता यायचं नाही. रात्री चोरून जायचं निघून. गरिबांची फार त्रेधा बघा.'
'औषध का देत नाही. वडिलांना, आईला?'
'घरगुती औषध असतं. डॉक्टरची फी कोण देणार? तुम्ही या ना एकदिवस. याल का?'
'येईन. एखादे दिवशी रात्री येईन.'
'नक्की दिवस सांगा.'
'पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता.'
'बरं; या हं.'