अघटित घटना 4
'हे पाहा, तुमचे केस फारच सुंदर आहेत. एका नाटक कंपनीला ते हवे आहेत. तुम्ही जर ते कापून द्याल तर तुम्हाला त्यांची योग्य ती किंमत ती कंपनी देईल. तुम्हाला वाईट का वाटत आहे? मी एक उपाय सुचविला.' तो म्हणाला.
'केस कापून देऊ?' तिने दु:खाने विचारले.
'दुसरा कोणता उपाय?' तो म्हणाला.
'बरं तर. देईन कापून. माझ्या लिलीसाठी मी मानही कापून देईन, मग केसांची काय कथा? आणि आज हे केस सुंदर आहेत. उद्या हे फिक्कट होतील. त्यांना उद्या कोण विचारणार आहे? आज सार्थकी लागत आहेत. माझ्या आजारी मुलीच्या कामी येत आहेत. उद्या सकाळी या. कापून ठेवीन हे केस.'
तो मालक गेला. लिलीची आई तेथे शून्य मनाने बसली होती. तिने आरशात पाहिले. ते केस किती सुंदर दिसत होते! तिच्या म्लान मुखाला अद्यापही ते शोभा देत होते. ते केस कापून टाकायचे? हो. मुलीच्या सुखासाठी तसे करणे भाग होते. तिने कात्री घेतली व ते लांब सडक सुंदर केस कापून टाकले. त्या केसांची गुंडाळी करून तिने ठेवली. दुसर्या दिवशी सकाळी मालकाजवळ ते केस तिने दिले. पंचवीस रुपये मिळाले. ते रुपये तिने मुलीला पाठवून दिले.
परंतु त्या खाणावळवाल्याला अधिक लोभ सुटला. लिलीच्या आईजवळ कितीही पैसे मागितले तरी ती देईल, असे त्या लोभी मनुष्यास वाटले. थोडे दिवस जातात न जातात, तो पुन्हा त्याचे पत्र आले. त्याने आणखी जादा पैशांची मागणी केली होती. लिलीची आई कोठून पाठविणार पैसे?
ती अभागिनी खोलीत सचिंत बसली होती. काय करावे तिला सुचेना इतक्यात मालक तेथे आला.
'तुम्ही पुन्हा का सचिंत?' त्याने प्रश्न केला.
'पुन्हा पैसे पाहिजेत,' ती म्हणाली.
'मी सुचवू एक उपाय?' त्याने विचारले.
'शरीर विकण्याचा का?' तिने दु:खाने प्रश्न केला.
'शरीर नाही,' तो म्हणाला.
'मग काय?' ती म्हणाली.