अंमलदाराचा शेवट 2
त्या अंमलदाराने हात जोडले. तो गाडीतून उतरला. त्याने त्या गाडीवानाला 'जा' सांगितले. गाडी गेली आणि तो अंमलदारही गेला.
कोठे गेला? तो समुद्रकाठी गेला. समुद्र उचंबळला होता. चंद्र मिरवत होता. त्या अंमलदाराचाही हृदयसिंधू उचंबळला होता, डोळयांतून धारा लागल्या होत्या. तो समुद्रात शिरला. पुढे पुढे चालला. सुटले पाय. लाटांनी त्याला नाचवले, उचलले, बुडवले, हृदयाशी धरले.
दुसर्या दिवशी ते प्रेत तीराला लागले. पोलिस आले तो तो अंमलदार! पंचनामा झाला. आत्महत्या - असा निकाल देण्यात आला. ती आत्म्याची हत्या होती का तो आत्म्याचा उध्दार होता? आंधळया दुनियेला काय कळणार, काय दिसणार?
'पोलिस अंमलदाराची आत्महत्या.' अशा शीर्षकाखाली दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून ती बातमी आली. वर्तमानपत्र विकणारे ओरडत होते. वालजीने ऐकले. त्याने वर्तमानपत्र विकत घेतले; ते घेऊन तो खोलीत आला. त्याने तो मजकूर वाचला. त्याने ते पत्र खाली ठेवले. तो गंभीरपणे बसला.
'आजोबा, असे का बसलेत?' लिलीने विचारले.
'संपलं सारं.' तो म्हणाला.
'काय संपलं? आता तर सुरू होईल सारं!'
'तुझं सुरू होईल. तुझा संसार सुरू होईल. परंतु आमचा संपला. तो गेला. आता मीही बहुधा लवकरच जाणार. माझंही जीवितकार्य जवळजवळ संपल्यासारखंच आहे. उगी, रडू नको लिल्ये. अगं; जन्मला तो जायचाच एक दिवस! वेडी कुठली, उगी.'