क्रांतीची ज्वाला भडकली 5
'अहो, हा मनुष्य तुमच्यात कसा आला? हा तर सरकारी अधिकारी! म्हणूनच त्यानं तोफ निकामी केली. उडणार नाही असं सांगितलं. हा गुप्त पोलिस खात्यातील बडा अधिकारी आहे.' वालजी त्या पोलिस अंमलदाराकडे बोट करून म्हणाला.
क्रांतिकारकांनी त्याला बांधून ठेवले. त्याचा मागून निकाल लावू असे ठरले. लढाई सुरू होती. तो सारा वाडा उद्ध्वस्त होत आला. त्या वाडयात राहाण्यात अर्थ नव्हता. जवळच्या दुसर्या वाडयात घुसावे असे ठरले. मंडळी निघाली; परंतु त्या बांधलेल्या अंमलदाराचे काय करायचे? त्याला गोळी घाला असे लोक म्हणाले; परंतु वालजी म्हणाला, 'तो माझा वाट आहे. सूड मीच घेईन.' इतरांनी बरे म्हटले. क्रांतिकारक बाहेर पडले. त्या दुसर्या वाडयात ते घुसू लागले. बाहेरून सरकारी पलटणींनी गोळयांचा वर्षाव केला. प्रेतांचा खच पडला. बाहेर अंधार पडला. रात्र झाली. वाडयाचे दार एकदम बंद करण्यात आले.
इकडे वालजीने त्या अंमलदाराचे काय केले?
'आता मी तुमच्या ताब्यात आहे. घ्या सूड.' तो अधिकारी म्हणाला.
'मी तुम्हाला सोडून देऊन सूड घेतो.' वालजी म्हणाला.
वालजीने त्याला मुक्त केले. वालजी एकदम वाडयाबाहेर पडला. त्या दुसर्या वाडयात तो जाणार, तोच दरवाजा बंद! आणि त्याच्या पायाजवळ कोण? तो तर दिलीप! गोळीने जखमी पडला होता. त्याला शुध्द नव्हती. बाहेर अंधार होता. वालजीने एकदम दिलीपला पाठुंगळीस मारले. तो वाडयाच्या पाठीमागच्या वाजूने निघाला. धुडुम धुडुम गोळे येत होते. बंदुकींच्या गोळया सूं सूं करीत येत होत्या.
वालजी जात होता. लिलीचे प्रेममय प्राण घेऊन जात होता. इकडे कोठे चालला वालजी? इकडे तर खाडी आहे. समुद्र आहे. ओहोटी होती. पाणी फारसे नसेल. वालजी पाण्यात शिरला. चिखल होता. मोठया कष्टाने पाऊल टाकीत तो चालला. तो पलीकडे आला. तेथे झाडाखाली तो बसला. त्याने दिलीपची जखम बांधली. त्याच्या डोक्यावर पाणी शिंपले. परंतु शुध्द नाही.