साधू 3
पाऊस जरा थांबला; परंतु रात्री खूप येणार अशी लक्षणे दिसत होती. इतक्यात तिकडून एक मनुष्य आला. तो नंदगावात जात होता. झाडाखाली एक दु:खी मनुष्य आहे असे पाहून तो थांबला.
'रात्रीच्या वेळी इथं का रे बसलास? आज मोठा पाऊस येणार.'
'मग कुठं जाऊ? मला घर ना दार, सगा ना सोयरा. कुठं जाऊ? या गावात कुणीही रात्रीपुरता आधार देईना.'
'असाच सरळ जा. मग उजव्या बाजूला वळ. तिथं एक लहानसं घर आहं. घराभोवती बाग आहे. त्या घरी तुला जागा मिळेल. तिथं सर्वांना परवानगी आहे. तिथं कधीही कोणाला नकार दिला जात नाही. जा, तिथं जा. त्या घरात एक साधू व त्याची बहीण राहातात. अनाथांचं ते घर आहे. जगानं टाकलेल्यांचं ते घर!'
असे सांगून तो भला मनुष्य निघून गेला. आमचा हा दुर्दैवी मनुष्य उठला व चालू लागला. काही वेळ चालल्यावर त्याला ते घर दिसले. कुत्री वगैरे तेथे नव्हती. तो घराजवळ आला. त्याने दार लोटले. तो ते उघडले. दाराला कडी नव्हती एकदम कोणी तरी उठले. दिवा लावण्यात आला.
'कोण तुम्ही?' साधूने विचारले.
'मी एक अनाथ आहे. रात्रीपुरता आधार हवा. गावात कुणीही जागा देईना, शेवटी तुमच्याकडे आलो. तुम्ही तरी निराश करणार नाही असं मनात धरून आलो आहे.'
'या, बसा. हे घर तुम्हा सर्वांचे आहे. बसा हो, बसा इथं. निजायची वेळ झाली म्हणून आताच दिवा मालवून पडलो होतो. तुमचं जेवण वगैरे झाले आहे का?'
'नाही.'
'मग आधी जेवा. थांबा, मी ताईला उठवतो. तिला ताजा स्वयंपाक करायला सांगतो. अहो, तुम्ही म्हणजे देवच. देवाला का शिळंपाकं वाढायचं? आधी आज उरलंसुरलं नसेलही काही. तुम्ही इथं बसा. नाही तर पडा. तुम्हाला पाय धुवायला पाणी देतो हो आणून.' असे म्हणून तो साधू आत गेला. त्याने दुसरा दिवा लावला. घरातून बादलीभर पाणी आणून दिले. त्या दुर्दैवी माणसाने पाय धुतले.