समुद्रात 2
परंतु अरेरे! हे काय? वालजी पाण्यात पडला! अथांग समुद्रात पडला. आता काय करणार? त्याने दुसर्यास वाचविले, परंतु त्याला कोण वाचवणार? समुद्र खवळला होता. प्रचंड लाटा उसळत होत्या. कोठे आहे वालजी? तो दिसतही नाही. त्या लाटांनी का त्याला गिळंकृत केले? पाहा कशा लाटा नाचताहेत, हलताहेत! पाहा ते त्यांचे जबडे. पाहा ते लाटांचे विकट हास्य. त्या लाटांमध्ये एकदम भयंकर खळगा पडतो. जणू पाताळाचे दर्शन. पुन्हा त्या वर उसळतात; परंतु वालजी कोठे आहे?
ते का वालजीचे डोके? आला वाटतो वर? छे! गेला खाली. घेतला समुद्राने बळी. त्या लाटा आनंदाने उसळताहेत. हसताहेत. लाटांची धिंगामस्ती सुरू आहे. त्यांचा भीषण खेळ; परंतु दुसर्याच्या प्राणाचा नाश.
गेला वालजी गेला. पत्ता नाही त्याचा. थोडया वेळाने ते गलबत हाकारले गेले. वालजीशिवायच ते गेले. वर्तमानपत्रात जाहीर झाले की, वालजी समुद्रात बुडून मेला. वालजीच्या आश्चर्यकारक जीवनाच्या हकीगती वर्तमानपत्रांतून आल्या. 'एका थोर चोराचा अंत' अशी कोणी शीर्षके दिली. हळुहळू वालजीचा सर्वांना विसर पडला. पोलिसांनाही विसर पडला. त्यांना हायसे वाटले. सतरांदा त्यांच्या हातावर तुरी देणारा, त्यांची बेअब्रू करणारा, त्यांची परीक्षा घेणारा जगातून एकदाचा नाहीसा झाला.