भूत बंगला 4
'मी जाऊ? माझं बोलणं तुम्हाला आवडत नाही? तुम्ही एकटे आहात. इथं तुम्हाला कंटाळा नाही येत? कोणाशी बोलणार, कोणाशी हसणार? तुम्हाला माणसांचा कंटाळा आहे? मी आवडत नाही तुम्हाला? तुमच्या टेबलावर बघा वस्तू कशा पडल्या आहेत. त्या मी लावून ठेवत्ये हं. सुंदर सजवून ठेवते टेबल.'
असे म्हणून तिने टेबलावरची पुस्तके, वह्या वगैरे सारे नीट लावून ठेवले. तिने केरसुणी आणून खोली स्वच्छ केली.
'तू कशाला झाडतेस?' तो म्हणाला.
'का बरं? खोली स्वच्छ दिसेल.'
'परंतु तू का मोलकरीण आहेस?'
'मोलकरणीनंच काम करावं असं का आहे. घरातील काम आपण नाही करीत?'
'माझी खोली का तुझं घर?'
'हो.'
'तुझं नाव काय?'
'माझं नाव छबी.'
'छान आहे नाव.'
'आणि तुमचं?'
'दिलीप.'
ती मुलगी एकदम निघून गेली. दिलीपची खोली जेव्हा जेव्हा उघडी असेल तेव्हा तेव्हा ती यायची. ती बोलत बसायची. कधी कधी ती त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहून त्याच्या केसांशी खेळायची. एखादे वेळेस दिलीप रागे भरे. ती मग ओशाळून निघून जाई.
वालजी, लिली कोठे आहेत? लांब आहेत. अफाट मुंबई शहरात कोणाचा कोणाला पत्ता नसे; परंतु ती पाहा एक मुलगी हिंडते आहे. ती कोणाला तरी शोधते आहे. कोण हवे तिला? इतक्यात तिला एक उंच मनुष्य दिसला. ती गर्दीतून धावत त्याच्याकडे गेली. तिने त्याचा कोट धरला.
'तुम्ही मला ओळखलंत का?' तिने विचारले.
'हो. कसं आहे तुमचं?'