Get it on Google Play
Download on the App Store

संध्या 38

दोघे मित्र निघून गेले. कल्याण घरीं गेला. वाडयाला आंतून कडी होती. त्यानें खूप हांका मारल्या. परंतु दार उघडेना. ब-याच वेळानें दार एकदांचें उघडलें.

“तूं रोज रोज रात्रीं असा उशीर करतो. उद्यांपासून कोणी दार उघडणार नाहीं, समजलास ?” चुलते रागानें म्हणाले.

कल्याण कांहीं बोलला नाहीं. तो मुकाटयानें जाऊन अंथरुणावर पडला. त्याच्या मनांत किती तरी विचार येत होते. संध्येची आठवण झाली. तिच्या पत्राचें उत्तर त्यानें अद्याप लिहिलें नव्हतें. सकाळीं उठल्यावर तो पत्र लिहायला बसला.

“प्रिय संध्याराणी,

पुष्कळ दिवस झाले. तुला पत्र लिहिलं नाहीं. रागावली असशील. आकाशांतील संध्येप्रमाणं लाल झाली असशील. परंतु त्या लाल रंगांतून शेवटी किती तरी सुंदर रंग प्रकट होतात. खरं ना ? संध्ये, रागावूं नकोस. येथील वेळ केव्हांच जातो. शाळा असते. अभ्यासमंडळं असतात. घरचं काम. आमचीं हिंडणींफिरणीं; आखाडा आहेच. संध्ये, तुझ्यावर तर मोठीच आपत्ति आली. वडील गेले. चुलते गेले. प्रेमळ आजी गेली. मी काय लिहूं, काय सांगू ? माझ्यापेक्षां तुलाच पुष्कळ समजतं. आजीजवळ तूं भावना व विचार यांचं शिक्षण घेतलं आहेस. तुझं पत्र किती सुंदर ! तुझ्यासारखं पत्र मला नाहीं लिहितां येणार.

संध्ये, मी कविता करीत असें; परंतु काव्याचा मोसम संपत आला. प्रत्येकाच्या आयुष्यांत कविता करण्याचा एक हंगाम येऊन जातो. माझ्या आयुष्यांत तो हंगाम पटकन् येऊन गेला. शब्दांच्या कवितांचा आतां कंटाळा आला आहे. मी हल्लीं पुष्कळ वाचतों. ज्ञानाची मला तहान लागली आहे. नवीन ज्ञानाची, नवीन विचारांची, क्रांतिकारक तत्त्वज्ञानाची. मी क्रान्तिकारक होणार आहे. एखाद्या अधिका-याचा खून करण्याची क्रान्ति नव्हे. तर नवीन समाज बनवणारी क्रान्ति. श्रमणा-यांचं राज्य स्थापण्याची क्रान्ति. हल्लीं सभांतून मी बोलत नाहीं. गाणीं म्हणतों. इन्किलाबचीं गाणी. क्रान्तीचीं गाणीं. ती तुला पाठवीन.

संध्ये, इंग्रजी शिकून मनुष्य मोठा होतो असं नाहीं. इंग्रजी भाषा हें एक ज्ञानाचं साधन आहे. इंग्रजी भाषेंत दुनियेंतील विचार आहेत. जो जो इंग्रजी शिकतो, तो मोठा असं नव्हे. उलट हे इंग्रजी शिकलेले पुष्कळ वेळां अधिक लाचार व भिकार होतात. त्यांना नोकरी हवी असते. श्रमांना ते कंटाळतात. कोणतंहि काम ते करूं शकत नाहींत. त्यांच्यापेक्षां गवंडयाच्या हाताखालीं राहण्यांत अधिक स्वतंत्रता व स्वाभिमान आहे. पुण्याला इंग्रजी शाळा पुष्कळ आहेत. इथं व्याख्यानंहि रोज असतात. याचा अर्थ इथं माणुसकी अधिक आहे असं नाहीं. इथं जुने अहंकार आहेत. आजच्या नवीन युगांतहि बुरसलेल्या धर्माचीं ढोलकीं वाजवणारे आहेत. हिंदुत्त्वाची पोकळ व बाह्यात्कारी शेखी मिरवणारे सकुंचित बुध्दीचे, डबक्यांतील बेडुक इथं भरपूर आहेत. सारा फाजिलपणा इथं आहे. कांहीं थोडयाशा तरुणांना विशाल दृष्टि आहे. बाकी सारे बिळांतील सरडे.

इथं मध्यंतरी एक थोर किसानकामगार कार्यकर्तें आले होते. त्यांचीं व्याख्यानं ऐकलीं. ते अभ्यासमंडळांतहि आले होते. “श्रमजीवि-सत्ता स्थापन झाली पाहिजे, संघटना आर्थिक पायावर हवी. पोटाचे प्रश्न हातीं घेऊन चळवळ केली पाहिजे. लोकांनीं स्वत:चं दैन्य मनांत आणून संतापूं नये म्हणून धर्माचीं थोतांड निघालीं. पूर्वकर्माचीं भ्रामक तत्त्वज्ञानं निघालीं. धर्म म्हणजे सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न. तो धर्म आज कुठंच नाहीं. पूर्वीहि नव्हता. खरा धर्म अद्याप यायचा आहे. सर्वांचा विकास झाला पाहिजे. सर्वांना संधि हवी. ना हिंदु-मुसलमान, ना स्पृश्यास्पृश्य. सारीं माणसं. सर्वांची मान उंच असूं दे.”

संध्ये, असं किती तरी त्यांनीं सांगितलं. असा समाज बनवायचा आहे. थोर कार्य आहे. या कार्यासाठीं लाखों उठायला हवेत. त्याग व बलिदान, संघटना व पराक्रम, स्वच्छ विचार व मोठी दृष्टि-यांची जरूर आहे.

आधीं कामगार संघटित होतात. ते मोठमोठया शहरांत एकत्र काम करतात. त्यांना एकदम एकत्र जमवतां येतं. कामगारांची सेना भांडवलवाल्यांनी आधीं एकत्र आणलेलीच असते. तिला नवीन नेतृत्व व दृष्टि दिली म्हणजे झालं. कामगारांची सर्वांची सारखीच परिस्थिति. आगा ना पिच्छा. घर ना दार. असा हा कामगार क्रान्तीच्या आघाडीवर उभा राहतो. तो क्रान्ति करतो. शेतकरी त्याला सांथ देतो. शेतकरी मागून उठावणी करतो. शेतकरी गांवोगांव पांगलेला. त्यांची संघटना करणं कठिण असतं. परंतु कसणा-याची जमीन, कर्ज रद्द करूं, कर माफ करूं, असे आर्थिक कार्यक्रम घेऊ तर शेतकरीहि पटकन् उभा राहतो, हें चीन देशांत दिसून आलं आहे.

संध्ये, पुढंमागं मी कामगारांत जाईन, शेतक-यांत जाईन. मुंबईला जाऊन कामगारांत राहीन. त्यांचे प्रश्न अभ्यासीन. कामगारांच्या चळवळींत पडेन. त्यांत लढेन, मरेन; देशासाठीं मरण म्हणजे कुणासाठी ? देश म्हणजे शेवटी देशातील ९० टक्के श्रमणारे लोक. त्यांच्यासाठीं जो जगतो तो खरा देशभक्त. तो खरा धार्मिक.

संध्ये, मी तुझ्याकडे कधीं येईन. मला काय ठाऊक ? तूं शरीरानं उंच झालीस. मनानंहि हो. भावनांनीं उंच हो. एक दिवस हा कल्याण तुझ्याकडे येईल. तुला मुंबई-पुण्याला घेऊन जाईल. पण आज सारं अशक्य आहे. अद्याप अवकाश आहे. आपण मोठीं होऊं या. आणखी मोठीं होऊं या. अजून आपण त्या दृष्टीनं लहानच आहोंत. नाहीं का ?

तुझ्या हातची भाजीभाकर खायला मी येईन. मिटक्या मारून मी खाईन. कलाहि पालेभाजी आवडते. कच्चीहि आवडते. मुळयाचा पाला मी कच्चाच भराभरा खाऊं लागतों व काकू रागं भरते. मी तुझ्याकडे आलों तर कच्ची पालेभाजी माझ्यापुढं ठेव. तुला त्रास नको. खरं ना ?

तुला तुझी आई खाऊ देते. मलाहि इथं खाऊ मिळतो. शिव्यांचा खाऊ. आणि मी का आतां लहान आहें, इतर खाऊ खायला ? संध्ये, मी जवळ जवळ वीस वर्षांचा होईन लौकरच. मी का लहान आतां ? परंतु मी लहान आहें असंच मला अद्याप वाटतं.

तुला मी गाण्यांचं एक पुस्तक पाठवीन. संध्ये, आनंदांत राहा. तुझ्या आईला प्रणाम. लहान भावंडांना आशीर्वाद. हें लहानसं पत्र पुरे. मला मोठं पत्र लिहितां येत नाही. मल्ल पत्रं नाहीं लिहूं शकत. तूं मात्र मोठं पत्र लिहीत जा हो.

तुझा

कल्याण”

संध्या

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
संध्या 1 संध्या 2 संध्या 3 संध्या 4 संध्या 5 संध्या 6 संध्या 7 संध्या 8 संध्या 9 संध्या 10 संध्या 11 संध्या 12 संध्या 13 संध्या 14 संध्या 15 संध्या 16 संध्या 17 संध्या 18 संध्या 19 संध्या 20 संध्या 21 संध्या 22 संध्या 23 संध्या 24 संध्या 25 संध्या 26 संध्या 27 संध्या 28 संध्या 29 संध्या 30 संध्या 31 संध्या 32 संध्या 33 संध्या 34 संध्या 35 संध्या 36 संध्या 37 संध्या 38 संध्या 39 संध्या 40 संध्या 41 संध्या 42 संध्या 43 संध्या 44 संध्या 45 संध्या 46 संध्या 47 संध्या 48 संध्या 49 संध्या 50 संध्या 51 संध्या 52 संध्या 53 संध्या 54 संध्या 55 संध्या 56 संध्या 57 संध्या 58 संध्या 59 संध्या 60 संध्या 61 संध्या 62 संध्या 63 संध्या 64 संध्या 65 संध्या 66 संध्या 67 संध्या 68 संध्या 69 संध्या 70 संध्या 71 संध्या 72 संध्या 73 संध्या 74 संध्या 75 संध्या 76 संध्या 77 संध्या 78 संध्या 79 संध्या 80 संध्या 81 संध्या 82 संध्या 83 संध्या 84 संध्या 85 संध्या 86 संध्या 87 संध्या 88 संध्या 89 संध्या 90 संध्या 91 संध्या 92 संध्या 93 संध्या 94 संध्या 95 संध्या 96 संध्या 97 संध्या 98 संध्या 99 संध्या 100 संध्या 101 संध्या 102 संध्या 103 संध्या 104 संध्या 105 संध्या 106 संध्या 107 संध्या 108 संध्या 109 संध्या 110 संध्या 111 संध्या 112 संध्या 113 संध्या 114 संध्या 115 संध्या 116 संध्या 117 संध्या 118 संध्या 119 संध्या 120 संध्या 121 संध्या 122 संध्या 123 संध्या 124 संध्या 125 संध्या 126 संध्या 127 संध्या 128 संध्या 129 संध्या 130 संध्या 131 संध्या 132 संध्या 133 संध्या 134 संध्या 135 संध्या 136 संध्या 137 संध्या 138 संध्या 139 संध्या 140 संध्या 141 संध्या 142 संध्या 143 संध्या 144 संध्या 145 संध्या 146 संध्या 147 संध्या 148 संध्या 149 संध्या 150 संध्या 151 संध्या 152 संध्या 153 संध्या 154 संध्या 155 संध्या 156 संध्या 157 संध्या 158 संध्या 159 संध्या 160 संध्या 161 संध्या 162 संध्या 163 संध्या 164 संध्या 165 संध्या 166 संध्या 167 संध्या 168 संध्या 169 संध्या 170 संध्या 171 संध्या 172 संध्या 173 संध्या 174 संध्या 175 संध्या 176 संध्या 177 संध्या 178 संध्या 179 संध्या 180