पाळणा - सुतार निर्गुणिचे तुजसाठीं...
सुतार निर्गुणिचे तुजसाठीं आणवीले । पाळणे रंगित बनवीले ॥
चहुं बाजूला चिमण्या मोर बसवीले । पाळण्यांत बाळ निजवीलें ॥
निज निज बाळा रे झोंके देतां हात दुखला । गाणें गातां कंठ हा सुकला ॥
जाई जुई चमेली पुष्पांनीं पाळणा गुंफिला । न जाणों खडा । बाळाला रुतला ॥१॥
केव्हांची मी हालवितें न सुचे कामधाम आणि धंदा नीज रे बाळा गोविंदा ॥
रडे एकचि हा हरि मोठा बाजिंदा । कोणी घ्या मनमोहन मुकुंदा ।
काय सांगूं सखे झालें बाळ मसिं यंदां । घेत अलाबला या तीनदां ।
घ्या घ्या बायांनों पाळण्यांत हरि मुतला । न जाणों खडा बाळाला रुतला ॥२॥
कोणे पापिणीची दृष्ट लागली ग बाई । बाळ अगदिच स्तन घेत नाहीं ॥
काय सांगूं सखे उपाय करुं तरी काई । नेत्र झांकले उघडित नाहीं ॥
जिव झुरतो हा दुःखी बाळाचे पायीं । कोठेंचि मन लागत नाहीं ॥
कोणें सवतीनें भरला भिलावा उतला । न जाणों खडा बाळाला रुतला ॥३॥
रुप बाळाचें काय सांगूं तुजपाशीं । जसें भानु आलें उदयासी ॥
अहा रे भगवंता घडलें काय अशा पुतळ्यासी । तुझी कळा न कळे कोणासी ॥
जीव ध्यातो रे ध्यातो सदा तुजपाशीं । चला वेगें वैकुंठाशीं ॥
मनिं गडबडला जीव सेवेमधीं गुंतला । न जाणों खडा बाळाला रुतला ॥४॥