पाळणा - जो जो जो जो रे त्रिनयना ।...
जो जो जो जो रे त्रिनयना । निज बा पंचानना ।
सृष्टीसंहार तमोगुणा । भोळ्या निर्मळ मना ॥ध्रु०॥
सृष्टी संहार तुज तेणें । बहु झालीं जागरणें ।
तो भ्रम सांडूनियां त्वां देणें । निजीं निजसुख घेणें ॥जो०१॥
भिक्षाटण करिताम अवधूता । श्रमलासी बहु फिरतां ।
सोडुनि निजकांता त्वां वसतां । केला डोंगर माथा ॥जो०२॥
ऐसा बैरागी निःसंगी । होतासी तूं जोगी ।
तो तूं स्त्रीलागीं अर्धांगी । घेऊन फिरसी जगीं ॥जो जो॥३॥
अहा त्वां कैसें तप केलें । तुज भिल्लीनें भुलवीलें ।
बाळपणासी धरियेलें । बायलेच्यानि बोले ॥जो जो०॥४॥
ऐसा निलाजरा तूं अससी । शंका नाहीं तुजसी ।
किती रे सांगावें तुजपाशीं । त्र्यंबक प्रभु सुखराशी ॥जो०५॥