बागुलबावा आला
जो जो जो बाळा नको रडूं गोपाळा । दारी बागुलबाआ आला बागुलबावाचे रुप दिसे मनोहर ।
अंगावरी व्याघ्रांबर त्रिशूल डमरु शंख शोभे फणिवर । गळ्यामध्ये मनुष्यमुंडांचे हार ॥
मिशा पिंगट शिरी जटांचा भार । वरी वाहे झुळझुळ नीर ॥
भस्म सर्वांगी कंठ दिसतो नीळा । आरुढोनि नंदिवर आला ॥
जो जो ॥१॥
बागुलबावाचा ऎकुनि शब्द कानी । तेव्हा रडे चक्रपाणीं ॥
मातेसी म्हणॆ चल बाहेर घेवोनी । दाखवी बागुल नयनी ॥
नको छंद घेऊ उभा राहे गोपाला । मी भिक्षा वाढिते त्याला ॥ जो जो ॥२॥
म्हणे नंदाला घ्या याला क्षणभरी । मी भिक्षा वाढिते वेगी ॥
मोत्ये पोवळ्यांनी भरुनी । गेली द्वाराबाहेरी घेउनी ॥
घ्या घ्या बायांनो नका करु उशीर । माझे बाळ भितरें फार ॥
नव्या नवसांनी एवढाचिं पुत्र आम्हांला । तो मोठ्या दैवे लाभला ॥
बाळ आहे कसे आहे सर्वां माहीत । दिसे जगावरी नाईक ॥
मी बाळाचा शब्द ऎकुनि कानी । त्वरे आलो मी धांवोनी ॥
पहावे बाळाला इच्छा माझे मनी । त्वरें आलो मी धांवोनी ॥
अहा नारायणा हरिसेवेमधी गुंतलो । मी अनंत नमितों त्याला ॥
जो जो ॥३॥