रजनीमाईचा पाळणा
बाळा जो जो अंगाई । गाई रजनी माई ॥धृ॥
निजली सारी रानपाखरे
गाती निर्झर, गाती वारे
गाती दिशाही दाही, बाळा जो जो अंगाई ॥१॥
आकाशामधी शब्दावांचुनि
यक्ष यक्षिणी गाती गाणी
लहर तरंगत येई , बाळा जो जो अंगाई ॥२॥
सुबक रुपेरी तुझा पाळाणा
नक्षत्रांच्या राघू मैना
छतास जडल्या पाहा, बाळा जो जो अंगाई ॥३॥
हंसरा राजस माझा राणा
कुणा दिसेना कधि रडताना
दृष्ट न होवो बाई , बाळा जो जो अंगाई ॥४॥