आजीबाईचा जुना पाळणा
पाळणा बांधीला , रंगीत सुंदर । तान्हा सुकुमार माउलीचा ॥
पालख पाळणा , मोत्यांनी विणीला ।
मामानें धाडीला, तान्हे बाळा ॥
रंगीन पाळणा, त्याला रेशमाची दोरी ।
हालवीते गोरी, इंदूताई ॥
पाळण्याचे दोर , जसे मोतियाचे सर ।
शोभिवंत घर, पाळण्याने ॥
आंथरुण केले , पांघरुण शेला । निजवीले तुज , मधुबाळा ॥
आंथरुण केले , मऊ उबदार । झोप चारी प्रहर, तान्हे बाळा ॥
सकळच्या वेळी, किती असे कामधंदा । नको रडू तू गोविंदा, तान्हे बाळा ॥
पहांटेची वेळ, नीज रे बाळपणी । ऊठ तू मोठेपणी , तान्हे बाळा ॥
नीज रे बाळाका , आपुल्या पालखी । तुला रक्षण जानकी - रघुनाथ ॥