समाजधर्म 47
आता युरोपमध्ये कसे आहे ते पाहू चला. ज्या युरोपमधील ध्येये व विचार कृतीत आणण्यासाठी निर्भयपणे सदैव धडपड चाललेली असते तेथे जाऊ या. व्यक्तीने सभ्य, स्वच्छ व सुसंस्कृत असण्यासाठी अमुक अमुक त-हेने वागलेच पाहिजे अशी हिंदुस्थानातल्याप्रमाणे युरोपातही बंधने आहेत. तेथे सामाजिक मताला फार महत्त्व आहे. असल्या गोष्टीची तिकडे चर्चा होत नाही. समाज त्या त्या गोष्टीची उचलबांगडी करून फेकून देतो. युरोपात आचारपध्दती लहानपणी घरात स्त्रियांकडून शिकविली जाते. लहानपणी हे मुलाला शिकविल्यावर मोठेपणी तो आपल्या या वर्तनापासून, या आचारपध्दतीपासून च्युत होणार नाही अशी अपेक्षा केली जाते. परंतु मोठेपणी त्याने मर्यादाभंग जर केलाच तर त्या बंडखोराला कसे शासन करावे हे तेथील बलवान व प्राणवान समाजाला माहीत असते. समाज त्या व्यक्तीला स्थानच देत नाही, त्याची कोणी विचारपूस करीत नाही. त्याने केलेल्या बदलाला महत्त्व देऊन त्याची कोणी चर्चा करीत बसत नाही, चर्चा केल्याने वस्तू मरत नाही; तर तिची बीजे फोफावतात; मरण्याऐवजी ती वस्तू फोफावते. वस्तूची उपेक्षा केल्याने ती मरून जाते. तिचा गाजावाजा करण्याइतके महत्त्वच तिला देऊ नये म्हणजे ती वस्तू मागे पडते, तिची वाढ होणे बंद होते. या बारीकशा गोष्टीत सारे बळ एकवटावयास समाजाला सवडही नसते. ज्याला ज्यात स्वाभिमान वाटेल ते त्याला करू दे परंतु समाज योग्य वस्तूचीच वाढ करील.
आणखी नीट बघू या. हिंदुस्थानातील गोष्टींपेक्षा आता निराळ्याच गोष्टी आपणास दिसतील. संगोपनगृहातून बाळ एकदा बाहेर पडला, आईच्या किंवा दायीच्या खोलीतून बाहेर पडला, म्हणजे 'देवासारखा बैस, मुकाटयाने बैस, गडबड करू नको, बाहेर जाऊ नको, तेथे चढू नको, पडशील, ऐकतोस की नाही. ' असले आत्मनाशाचे विकासघातक शिक्षण त्यांना देण्यात येत नाही. पंगूपणाचे व परावलंबानाचे निष्क्रियत्वाचे व पराक्रमशून्यतेचे शिक्षण त्याला देण्यात येत नाही. मुलाने धीट व्हावे, त्याने आपण होऊन निरनिराळे आरंभ करावे, त्याने पुढाकार घ्यावा, त्याने आपले मत सांगावे, अंगावर जबाबदारी घ्यावी, त्याने बंड करावे, त्याने पडावे व पुन्हा उठावे अशाच गोष्टी त्याच्या मनावर गुरू व त्याचे मार्गदर्शक ठसवीत असतात. गुळाचा गणपती, ऐदीनारायण, अडणीवरचा शंखोबा, दगडोबा, नंदीबैल असा मुलगा न होता 'उड्या मारणारा, समुद्र ओलांडणारा, सूर्याला भेटावयास जाणारा बलवंत तू हनुमंत तू हो' असे त्याला शिकविण्यात येते. 'शेळीमेंढीसारखा न होता, अजागळाप्रमाणे न होता, सक्रिय व सामर्थ्यवान निर्भय सिंह हो' असे त्याला सांगण्यात येते. इच्छाशक्ति, नैसर्गिक स्वभाव या गोष्टी युरोपीय शिक्षणात फार महत्त्वाच्या मानल्या जातात. या वृत्तीचा तेथे खून करण्यात येत नाही; शिक्षणाच्या साळसूद नावाखाली या वृत्ती दडपल्या जात नाहीत. या वृत्तीचे तेथे संवर्धन केले जाते, त्याला नीट वळण लावण्यात येते. युरोपात जेव्हा एखादी गोष्ट सामुदायिक हिताची असते, सर्व राष्ट्राचा हिताचा प्रश्न असतो, तेव्हाच फक्त वैयक्तिक इच्छा मनुष्य बाजूला ठेवील, एरवी त्या तो बाजूला ठेवणार नाही, दाबून टाकणार नाही व दाबून टाकू देणार नाही. मनुष्याच्या वृत्ती व स्वभाव यांना शिस्त व वळण लावून थोर ध्येये, महनीय कल्पना, यांची साधने त्यांना बनविण्यात येते. याच कारणास्तव क्रीडांगणावर मारामारी मरू देतील, झोंबाझोंबी होऊ देतील. त्यात हेतू एवढाच असतो की, कोणालाही आपणास दाबून टाकले असे टाकावयास नको; दोघे लढा व प्रत्येकाला न्याय मिळू दे. असे केल्याने न्यायासाठी, हक्कासाठी सर्वांना झगडण्याचा हक्क आहे ते तत्त्व अंगी बाणते. मुलाला आपली शक्ति अजमावू देणे हे योग्य आहे. तसे त्याला करू न देणे म्हणजे त्याचे धैर्य खच्ची करणे होय. त्याला न्यायासाठी झगडू न देणे म्हणजे त्याच्या मनातील तळमळ व सत्यता यांना पुरून टाकणे होय. झगडा होऊ दे. झगड्यामध्ये स्वत:पेक्षा जो अशक्त आहे, त्याला जर तो मारील तर त्याच्याबरोबरीचे त्याची टर उडवतील व म्हणतील, 'तू केवढा व तो केवढा! त्याला मारावयास लाज नाही रे वाटली तुला? आमच्याजवळ करावयाचे होते बच्चंजी दोन हात-मग दाखविले असते पाणी! परंतु आम्हाला सोडून त्याच्यावर धावलास! दिसला आपला अशक्त, दिलीस ठेवून तोंडात! हाच का पराक्रम! अशी टीका आपल्यावर होईल ही भीती असतेच.
ज्या गोष्टीची उत्क्रांती व्हावयास अशियात अनेक शतके लागतात, त्या गोष्टी युरोपामध्ये दहा वर्षातच-बाळंतपणतच-शिकविण्यात येतात व तो मुलगा जगात वीर होण्यासाठी बाहेर पडतो. विष्णूच्या दशावतारात जर अनेक जन्मांची उत्क्रांती दाखविली असेल तर शौर्य, धैर्य, धीरोदात्तता येण्यास हजारो वर्षे लागणार हे नाही का दाखविले? परंतु या दशावतारांच्या कल्पनेत एकाच जन्माचा विकास जर दाखविला असेल तर हे युरोपचेच ध्येय हिंदुस्थानात शिकविले गेले असे म्हणता येईल. मत्स्य, कूर्म, वराहआदी याच जन्मातील आपल्या भूमिका होत. त्यातून गेले की मूल बटू वामन होते-लहानसा मनुष्य होते. परंतु बुध्द होण्यापूर्वी त्याला दोनदा क्षत्रिय व्हावे लागेल. स्वाभिमान व सत्य यांच्यासाठी प्रथम शारीरिक शक्तिनेच तो झगडावयास शिकतो. त्यानंतर प्रेताची शक्ति उत्पन्न होते. निर्भयतेने राम व कृष्ण अवतार समाप्त केल्यावर प्रेमसिंधू बुध्दाचा अवतार मिळेल. व्यक्ती आपल्या विकासात वंशानुसारी असते या अर्वाचीन सिध्दान्ताचेच हे स्पष्टीकरण नाही का? पुढे जो कलंकी अवतार अजून व्हावयाचा आहे त्यात आणखी उत्क्रांती व्हावयाची असेल. दया व प्रेम ही ध्येये सर्व व्यक्तिंच्या जीवनात यावीत म्हणून भगवान बुध्द कलंकीच्या रूपाने येऊन धडपणार नाहीत कशावरून? ध्यान सोडून पुन्हा कार्यक्षेत्रात ठाण घेणार नाहीत कशावरून?