समाजधर्म 43
परंतु याच्याही पुढे विचाराने नाही का जाता येणार? शिक्षण देण्यात याहून थोर उद्देश नाही का ठेवता येणार, कोणी वरच्या उद्देशाच्याही पुढे जाऊन म्हणतील, 'घरातील घाण्याला जुंपलेली, उष्टी-खरकटी करणारी, धुणी धुणारी, भातभाजी करणारी-जिला विचार समजत नाही, विचार करण्याची शक्ती जिला नाही, मनाच्या व बुध्दीच्या तुरुंगात पडणारी एक कैदीण-केवळ एक श्रमवाही जीव. . . अशी आमची पत्नी असण्याऐवजी जिच्याजवळ आम्हाला काव्यशास्त्रविनोद करता येईल, आमच्याच तोलाची जिची विचारसंपत्ती व बौध्दीक क्षमता आहे, जी चर्चा करील, वादविवाद करील, अशी पत्नी असणे आम्हाला आवडेल; आणि यासाठी म्हणून मुलींना शिक्षण दिले पाहिजे.'
तरीसुध्दा स्वत:ची अभिरुची, आम्हा पुरुषांची आवड हाच शिक्षण देण्यातील प्रमुख हेतू दिसतो. वरील सर्व विचारसरणीतून पुरुषांच्या आवडीनिवडीची पूजा आहे; तेथे स्त्रीच्या आत्म्याची पूजा नाही. अगदीच सामान्य हेतूपेक्षा-नवर्याला मदत करता यावी, त्याच्याजवळ काव्यशास्त्रविनोद करता यावा हे हेतू जरा वरचे आहेत हे खरे, पण एवढ्याने स्त्रियांच्या शिक्षणाचे आपण खरे कैवारी, खरे पुरस्कर्ते झालो आहोत असा दावा आपणास करता येणार नाही, अशी प्रौढी मिरवता येणार नाही.
पुरुष हा मनुष्यप्राणी आहे व स्त्रीही मनुष्यप्राणी आहे. ह्यासाठी स्त्रीला शिक्षण हवे. पुरुषाप्रमाणेच ती. भाऊ व बहीण नावे निराळी, परंतु आतील दिव्य मनुजता, आतील थोर मनुष्यत्व ते एकच. नारी नर दोन नावे, दोन शब्द निराळे, परंतु आतील क्षुधाभुखा त्याच. या एकाच समानतेच्या भूमिकेवर उभे राहून स्त्रीने शिक्षण मागितले पाहिजे व पुरुषाने ते देण्याला पुढे आले पाहिजे. ' मी मनुष्य आहे म्हणून मला शिक्षण हवे. माझ्यातील मनुष्यत्वाचा विकास व्हावा म्हणून मला शिक्षण हवे' असे स्त्रीने सांगितले पाहिजे व पुरुषाने ते मान्य केले पाहिजे. शिक्षणाचे हे ध्येय जेव्हा असेल तेव्हाच स्त्री व पुरुष परस्परांस पूज्य मानतील परस्परांस मान देतील; त्या वेळेसच परस्परांची परस्परांवर श्रध्दा बसेल व विश्वास बसेल. ह्या हेतूने जेव्हा स्त्रीला शिक्षण देण्यात येईल तेव्हाच स्त्री ज्याप्रमाणे पुरुषाला पूज्य मानते त्याप्रमाणेच पुरुषही स्त्रीला पूज्य मानील. स्त्रीशिक्षणात जोपर्यंत वरील हेतू नाही तोपर्यंत पुरुषाला स्त्री ही पूज्य वाटणार नाही, सहधर्मिणी व समानशील वाटणार नाही, समान योग्यतेची वाटणार नाही; तोपर्यंत त्याच्या करुणेची व कीवेची एक वस्तू हेच तिचे स्वरूप राहणार. परंतु वरील उदात्त हेतू त्या शिक्षणात आणा की पुरुषपणाच्या दृष्टीत बदल होईल, स्त्रियांकडे पहाण्याच्या वृत्तीत क्रांती होईल. लिंगभेदाचा अशा रीतीने जणू विसरच पडून दोन जरा निराळे आकार परंतु आतील दिव्य मनुजता एकच ही भवना मनात अवतीर्ण हांईल. ' जे जे न्यायय आहे, सुंदर आहे त्याचाच विचार करा. ' असे एक वाक्य आहे. ' या वाक्याची पूर्तता करा. ' असा आर्तरव पुरुषांपेक्षा स्त्रियांनीच सदैव केला आहे. परंतू ज्ञानाशिवाय ही पूर्तता कशी बरे करता येईल?
पुरुषाइतकी स्त्रीही जर मनुष्य असेल तर पुरुषाप्रमाणे आपला पूर्ण विकास करून घेण्याचा तिलाही हक्क आहे; ते तिचे कर्तव्यच आहे. तिच्या विकासाला विरोध करणारा जो असेल तो स्वातंत्र्य हिरावून घेणारा, दुसर्याला गुलाम करू पाहणारा, अप्पलपोटया व स्वार्थी चोर आहे यात शंका नाही. तुम्ही पुरुषांच्या विकासावर भर देता, मग स्त्रीच्या विकासावर का देत नाही? तिच्या हृदयाची, बुध्दीची व मनाची भूक नको का तृप्त व्हावयाला? पुरुषांना शिक्षण देताना जर त्यांच्या देहाचा विचार करीत नसाल, तर स्त्रियांच्याही बाह्य देहादिकांचा विचार नका करू. जर एकाला उन्नत करू इच्छित असाल तर दुसर्यालाही करा. दोन्ही चाके सारख्याच उंचीची होऊ देत, म्हणजे रथ नीट चालेल. आदळआपट होणार नाही. दोघांना उंच होऊ दे, मोठे होऊ दे, दोघांचा विकास होऊ दे. स्त्रीचा विकास-मनोबुध्दिहृदयाचा विकास-हे स्त्रीशिक्षणाचे पवित्र ध्येय झाले पाहिजे. स्त्रीच्या स्वत:च्या चारित्र्यासाठी तिच्या आत्म्याच्या आनंदासाठी शिक्षण असले पाहिजे. पुरुषांच्या हिशोबासाठी, त्याच्या नफ्यातोट्यासाठी म्हणून कधीही दिले जाऊ नये.
परंतु विशाल हृदय व विशाल बुध्दी असल्यासशिवाय हे कसे स्फुरणार? दुसर्याच्या जीवनात शिरता आल्यावर त्याचा प्रश्न सोडवता येतो. स्त्रियांच्या जीवनात थोर सहानुभूतीने जेव्हा पुरुष शिरतील तेव्हाच शिक्षणातील ही नवी दृष्टी, ही नवीन नीती त्यांना स्फुरेल. जगातील आपल्या सर्व व्यवहारात हेच आहे. दुसर्यांच्या सुखदु:खात निपेक्षपणे होऊ या म्हणजे खरी जागतिक नीती निर्माण होईल, तोपर्यंत नाही.