समाजधर्म 31
१३ श्रम
सर्व अवतारी पुरुषांनी एकजात कामावर भर दिला, श्रमावर जोर दिला. सर्व महापुरुष एकच सांगतात की, श्रम करा, कष्ट करा. कष्टविणे कीर्ती नाही. श्रमविणे फळ नाही. महापुरुष अवतारी पुरुष कशासाठी जन्मले? परमानंदात पोहत राहणे त्यांना सहज शक्य होते. त्यांच्या दृष्टीला सर्वत्र एक परब्रह्यच होते असे असून ते खाली का आले? पुन्हा ह्या चिखलात का उतरले. जन्ममरणाच्या फेर्यात का पडले? मोक्ष त्यांनी का दूर ठेविला? मानवजातीच्या सेवेसाठी, श्रमाची महती, कष्टांच महती कर्माची दिव्यता मानवांना पटवून देण्यासाठी आईची मिठी सोडून ह्यासाठी ते आले. आपली दु:खे पाहून कळवळून ते धावून आले. आता मधून मधून ते आईची भेट घेतात. आता नेहमी मांडी त्यांना नाही. आपल्या दुसर्या बंधुनाही आईजवळ घेऊन जाण्यासाठी ते तळमळत असतात. रात्रंदिवस श्रमात असतात. भगवान बुद्ध म्हणाले. ''एकही जीव दु:खी आहे तोपर्यंत मी मोक्ष कसा भोगू? मी त्याच्यासाठी पुन्हा खाली येईन''. अशा थोर संतांची जीवने किती सुंदर, किती उदार, किती धन्य, किती थोर! त्यांच्या दयेला पार नाही, क्षमेला सीमा नाही, श्रमांना अंत नाही.
काय वाणू या मी संतांचे उपकार। मज निरंतर जागवीती।
काय वर्णू आत न पुरे ही वाणी। मस्तक चरणी ठेवीतसे॥
कोणत्या शब्दांनी त्या महात्म्यांचे वर्णन करावे? त्यांना कृपेचे दीप म्हणू का पावनगंगा म्हणू? हे थोर संतजनांनो, तुमच्याशी एकरुप होण्याची कशाने बरे मिळेल? तुमच्याशी मिळून जाण्याची योग्यता कशाने बरे लाभेल?
कशाने? एकाच साधनाने, श्रमाने, अखंड सेवेने, सुखाला फाटा द्या, सारे क्षुद्र अभिमान गुंडाळून ठेवा, ऐषआरामात रजा द्या, आळस नको, दंभ नको, ऐट नको, अहंकार सर्व ओतून हृदयाचे व बुध्दीचे भांडे रिकामे करा. पोकळ करा. दुसर्यासाठी श्रमा, ध्येयासाठी झिजा. मुर्ख स्वार्थासाठी धडपडतात. तुम्ही नि:स्वार्थपणे लढा. बुडणारा मनुष्य काडीचा आधार घेण्यासाठी ज्याप्रमाणे धडपडतो. त्याचप्रमाणे सेवेची संधी आपण गावता कामा नये. कृपया धनाच्या कणासाठी मरतो तसे आपण सेवेसाठी मरु या. सेवा लहान मोठी असे मनात नका आणू.
संन्यासी आपल्या पावित्र्याला किती व कसा जपतो! चुकूनही पाऊल वेडेवाकडे पडू नये म्हणून कसा डोळ्यात तेल घालून जागत बसतो, अपरंपार त्याग करावयास संन्यासी सदैव सिध्द असतो. मी माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ होतो असे मरणकाळी स्वत:ला स्वच्छपणे म्हणता यावे ही त्याची इच्छा असते. मी माझ्या ध्येयाला कमीपणा आणला असे लोकांनी म्हणू नये, लोकांना असे म्हणण्यास जागा देऊ नये म्हणून तो दक्ष असतो. आजन्म तो त्याग ओतीत असतो, व शेवटी आत्महुती देतो. त्या व्रतस्थ संन्याशाप्रमाणे आपणही जे जे मलिन आहे व भ्याड आहे त्यापासून दूर राहिले पाहिजे. असत्य व अन्याय्य जे जे असेल, त्याच्याशी तडजोड करावयास कधीही हात पुढे करता कामा नये आपणावर जे काम सोपवले असेल. जी जबाबदारी आपणांवर असेल, त्यासाठी जरुर पडले तर आपण मेले पाहिजे. विश्वासघात करणे, आपणांवर टाकलेल्या विश्वासाला आपण अपात्र ठरणे, याहून नीच दुसरे काय आहे? जीवनाचा अर्थ ज्यांना समजतो असे महापुरुष विश्वासघात करणे पृथ्वीवरचा नरकच मानतात.