समाजधर्म 23
प्राचीन संस्कृतीने ज्या गोष्टी मानवी आवाक्यात आणल्या होत्या. त्या आर्वाचीन संस्कृतीने उधळून टाकल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे आजचे जीवन साधे रहिले नसून गुंतागुतीचे व कृत्रिम झाले आहे. नवसंस्कृतीने आपल्या गरजा कारण नसतातना बेसुमार वाढविल्या आहेत नाना प्रकारचे मोह मार्गात उभे केले आहेत. हे मोह पूर्वीच्या आपल्या बाजूला खेडयात, त्या खेडयातील झोपडीत आपणास माहितही नव्हते. आज निरूपयोगी अशा शेकडो वस्तू उगीच्या उगीच अडगळीसारख्या घरात भरून ठेवण्याची वेडगळ सवय आपणास लागत आहे, आणि ही सवय जडल्याने शांतपणे, अविश्रांत श्रम करण्याचा, आपल्याच कामात दंग जाण्याचा जो आपला बहुमोल गुण तो गापण गमावून बसलो आहोत. दगड पदरी घेऊन चिंतामणी फेकून दिला आहे. आपल्या घरात वेडयावाकडया तसबिरी कोठलीतरी व कसलीतरी चित्रे, मोडक्या खुर्च्या व फुटकी टेबल बाके व स्टुले. कप व बशा भरल्या आहेत व त्या वस्तू साफसूफ करण्यासाठी भाराभर श्रम खर्च होतोय व वेळ वाया जातो. हया वस्तू घरात आहे. आपण नवीन ऐट दाखवू लागलो आहोत, श्रीमंती मिरवू पाहात आहे. परंतु आपला तो पूर्वीच्या सुंदर व मनोहर असा थोर साधेपणा, ती चित्त प्रसन्नता, शांती व एकाग्रता, ती हृदयाची तन्मयता या गोष्टी गमवण्यासाठी बसलो आहोत.
तो थोर साधेपणा त्या साधेपणाची पूजा करावयास फिरून साधेपणात असलेले ते थोर फायदे चला ते परत मिळवू. घरात अडचण नसणे, खटाळभर वस्तू नसणे, ते स्वच्छ, सुंदर व रिकामे असणे म्हणजे सौंदर्य. काही नसण्यात जे सौंदर्य आहे ते पुन्हा आणू या विचार गंभीरता तिचा रंग पुन्हा पैदा करू या! साध्या जमिनीवर बसणार्या मनात परमोच्च विचार रमणीय कल्पना! साधी राहणी व उच्च विचारसरणी जवळ मंद प्रकाश देणारी समई, परंतु हृदयाची ती श्रीमंती चला आपली करू. जीवनाच्या साधनाची चिंता करू; जीवनाला फुलवू या. या, त्यातच मन ओतू या. नोकरी कशी मिळेल. पोटाची टीचभर खोल कशी भरेल. याचीच विवंचना ज्याकाळात सारे लोक करीत असतात. अशा उदरभर व पोटभर काळात थोर शंकाराचार्य, भगवान बुध्द हे जन येत नसतात. ताडामाडाच्या झाडाखाली झापांनी शिवलेली झोपडी ती पुरेशी आहे. तेवढी श्रीमंती पुष्कळ झाली या देहाला. मनाला व बुद्धिला मात्र सर्व त्रिभुवनातील सौंदर्य व विचार आणण्यासाठी पाठवा. बुद्धिने व आध्यात्मिक सामर्थ्याने, ज्ञानाने व चारीत्र्याने सजलेले सिंहाचे छावे प्रसविण्याचे ज्या दिवशी भारतीय माता बंद करतील, असे सिंहकिशोर वाढविण्याचे सोडून देतील. त्या दिवशी भारताचे नष्टचर्य ओढवलेच समजा, भाग्यभास्कर कायमचा मावळला असे नि:संदेह समजा.
संन्याशाला स्वत:चे जीवन जितके पावन व पवित्र वाटते. तितके कलावंताला स्वत:चे कर्म व स्वत:चे जीवन वाटू दे. आपल्या हातातील कामास प्रत्यकाने पवित्र मानावे, त्या कर्मास नटवावे. सजावावे, सारी दृष्टी त्या कर्मावरच खिळू दे. डोळा इकडे; तिकडे भटकता कामा नये, नजर दुसर्या गोष्टीकडे झुकता कामा नये. कोणत्याही फळावर दुष्टी नको. आपण साधेपणाने राहू. बाहय मदतीवर न विसंबता स्वत:वर विसंबू जसजसा. काल जाईल, तसतसा हृदयातील गोपाळकृष्णाच्या मुरलीचा आवाज ऐकू येऊ लागेल व त्या आवाजाने कर्म कसे करावे, रंग कोणते द्यावे, शब्द कोणता वापरावा, छिन्नी कोठे व कशी मारावी; सारे समजू लागेल. ध्रुवाच्या गालाला नारायणाने स्पर्श केला व तो वेद बोलू लागला. परंतु तोपर्यंत तो तपस्याच करत होता. आपण आपले काम करीत राहू या अपार श्रमांनी व हृदय ओतून केलेले जे आपले कर्म, त्याला परमेश्वर अमृतहस्ताने स्पर्श करील व ते कर्म सौंदर्याने भरून जाईल. आपल्या कर्मावर प्रसन्न होऊन त्याला परमेश्वर जेव्हा आशीर्वाद देतो. तेव्हा त्या कर्मात सौंदर्य नुसते नाचून राहते. सौंदर्य म्हणजे ईश्वरी कृपा ईश्वराचा प्रसाद. त्या प्रसादाला स्वत:ला विसरून केलेल्या श्रमाने पात्र होऊ या. आपापल्या झोपडीतून साधेपणात निरहंकारणाने झगडू या. प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक मारलेला घाव, फिरवलेले कलम, घेतलेली तान म्हणजे मुक्तिचेच स्वरूप होऊ दे. मोक्षद्वारच होऊ दे, फिरवलेले चाक, हाकलेली मोट; साक्षात्काराचे साधन होऊ दे. प्रत्येक घाव म्हणजे मुक्ती आहे. कारण तो मारताना आपण स्वत:ला विसरून गेलो होतो. अशा प्रकारे मुक्तिवर मुक्ती जेव्हा आपण रचीत जाऊ, प्रत्येक प्रयत्न ध्येय दाखवील अशा वृत्तीने केलेल्या अनंत प्रयत्नांचा पर्वत आपण रचू, तेव्हा मग ते परब्रम्ह ते परमतत्व - ते आपणांस मिळेल की नाही. ते प्रभुलाच माहित.
अपरंपार दया आपल्या जीवनात आणण्यासाठी बुध्ददेवांनी एक दोन नाही तर पाचशे वेळा जन्म घेतले, पाचशे वेळा जन्म ; मरणाच्या खस्ता त्यांनी खाल्ल्या. मग परिपूर्ण अशी, अव्यंग अशी एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी निस्सीम भावनेने श्रमाची एखाददुसरी घटका देण्यासही आपण का कुरकुर करावी? ज्या भक्तीमुळे, ज्या पूजेच्या फुलांमुळे आपली जीवने विश्वंभराच्या पदकमळावर वाहण्याच्या लायकीची होतील ती निर्दोष अव्याभिचारी भक्ती, तिचे मोजमाप करू इच्छिता काय? त्या भक्तीसाठी इतक्या घटका दिल्या, इतके दिवस दिले. असे व्यापारी जमाखर्च मांडीत बसणार होय? ज्या भक्तीने अनंत परमात्मा मापावयाचा असतो, त्या भक्तीला माप नसते. ती अमाप व अनंत असली पाहिजे. अनंत भक्तीनेच अनंत तुळिला जाईल. या सृष्टीत अपार विविधता आहे. जिकडे जाल तिकडे अनंताचे दर्शन घडेल.